अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन

सातारा नगर पालिकेच्या पंचवार्षकि निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी (साविआ), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी (नविआ) तसेच भारतीय जनता पक्षासह मित्र अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी ‘नविआ’तर्फे आ. भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले तर ‘साविआ’तर्फे माधवी कदम यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केले. कदम यांचा अर्ज भरतेवेळी उदयनराजे यांच्यासह त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी उदयनराजे यांनी नगर पालिकेच्या सर्व जागा निवडून आणणारच असा विश्वास व्यक्त करत घरातच सत्ता ठेवण्यापेक्षा ती कार्यकर्त्यांना देण्याचा मानस व्यक्त केला. खासदारकी माझ्या घरात, आमदारकी माझ्या घरात आता नगराध्यक्षपदही माझ्या घरात असे का, असा सवाल करून ते म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही अपेक्षा असतात, त्यांना संधी द्यायला पाहिजे. ती द्यायला नको का?

या नंतर लगेचच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ‘नविआ’च्या चाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी आ. भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. या वेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, चंद्रलेखाराजे भोसले उपस्थित होते. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर टीका केली. ते म्हणाले, की गेली पाच वष्रे आमच्या बरोबरचे मनोमिलन पटत नव्हते तर ५ वर्षे एकत्र काम कसे केले, असा प्रतिप्रश्न केला. मनोमिलनाबाबत आम्ही तडजोडीस तयार होतो. पण ते आमचे काका श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्याकडे बोलण्यासाठी आलेच नाहीत. या वेळी चंद्रलेखाराजे भोसले यांनी वेदांतिकाराजे यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.