मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गुरूवारी लातूरमध्ये अपघात झाला. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबतचे सहकारी या अपघातातून बचावले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपण सुखरुप असल्याची माहिती ट्विटर आणि माध्यमांशी संपर्क साधून दिली. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा सुरू झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून त्यांची विचारपूस केल्याचे समजते.

वाचा: नेमका कसा झाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

लातूर दौऱ्यावर असताना फडणवीस आज निलंग्याहून मुंबईच्या दिशेने यायला निघाले होते. हेलिपॅडची व्यवस्था नसल्याने एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. हेलिकॉप्टर जमिनीवरून काही उंचीवर असताना हा अपघात घडला. सुदैवाने हेलिकॉप्टर मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुख्यमंत्र्यांसोबत सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि केतन पाटील हे तिघे प्रवास करत होते. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्व ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी फोन येऊ लागले. मग मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येऊन आपण सुखरूप असल्याचे सांगित काही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.