शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. नोटाबंदी आणि त्यामुळे देशातील सामान्य जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकीच्या विवाह सोहळ्यासाठी नागपुरात दाखल झाले. मात्र लग्नाला उपस्थिती लावण्याआधी उद्धव ठाकरे मोहन भागवत यांच्या भेटीसाठी रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा केली. ‘नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, ही आमची आणि सर्वांचीच इच्छा आहे, याबद्दल सरसंघचालकांशी चर्चा झाली,’ अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. यावेळा उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. भाजपचे नेते सरसंघचालकांच्या भेटीसाठी नेहमीच नागपुरात येत असतात. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसंघचालकांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नोटाबंदीमुळे सामान्य माणसाला होणाऱ्या त्रासावरुन शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे. तर संघाने अद्याप नोटाबंदीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यात चर्चा झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील सरसंघचालकांच्या भेटीसाठी संघमुख्यालयात दाखल झाले.

सरसंघचालक मोहन भागवत सकाळी नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाहाला उपस्थित होते. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लग्न सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर सरसंघचालकांच्या भेटीला आले. मात्र उद्धव ठाकरेंनी लग्न सोहळ्याला जाण्यापूर्वीच सरसंघचालकांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठा चर्चा होते आहे.