मराठवाडय़ात दौरा केल्यानंतर विदर्भातील नेत्यांना आणि आमदारांना सोबत घेऊन अधिवेशनानंतर विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात आमदार, मंत्री आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे आमदार मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागात जाऊन पाहणी करून आल्यानंतर मीही त्या भागात जाऊन आलो आणि तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. मराठवाडय़ात दुष्काळामुळे शेतकऱ्यांची फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात अशीच परिस्थिती असून, लवकरच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागाचाही दौरा करणार आहे. शेतकऱ्यांसाठी घोषित झालेले पॅकेय योग्य असून ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी जास्तीतजास्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी सर्वेक्षण करावे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेजचा लाभ होत नसेल तर ते त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवले जाईल त्यादृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना आमदारांच्या बैठकीत केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विदर्भात शिवसेनेला फारसे यश मिळाले नाही. जिल्ह्य़ात शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही त्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात संघटनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीने काम करण्याबाबत सांगण्यात आले आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना प्रथमच उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर हजारो कार्यकर्त्यांंनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावरून ते हॉटेल प्राईडमध्ये आल्यावर त्यांनी प्रथम सर्व मंत्र्यांशी त्यानंतर आमदार आणि पराभूत उमेदवार व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. अधिवेशन सुरू असले तरी राज्यातील शिवसेनेचे सर्व आमदार दुपारनंतर सर्व हॉटेलमध्ये आल्यावर उद्धव ठाकरे यांनी सर्वाशी बंदद्वार चर्चा केली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले होते. मात्र, त्यांनी पक्षात प्रवेश केला की नाही, याबाबत मात्र तपशील कळू शकला नाही.