रायगड महोत्सवाची सांगता
शिवकालीन किल्ले हे दगडधोंडे नसून आपची प्रेरणास्थाने आहेत. त्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे. त्यामुळे त्यांची योग्य निगा आम्ही राखू शकतो, त्यामुळे राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी राज्यसरकारकडे द्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
ते रायगड महोत्सवाच्या सांगतासमारंभात बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे, आमदार भरत गोगावले, विनायक मेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील गडकिल्ले ही आमची अस्मिता आहे. त्यांना वैभवशाली इतिहास लाभला आहे. त्यामुळे या गडकिल्ल्यांची योग्य निगा राखली गेली पाहीजे, पुरातत्त्वखात्याला ते जमत नसेल तर गडकिल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारला द्यावी ती आम्ही योग्य प्रकारे पार पाडू असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. किल्ले रायगड आणि पाचाड येथे लाइट आणि साऊण्ड शोच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा इतिहास जिवंत पर्यटकांसमोर सादर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी या वेळी केली. राज्य सरकारच्या वतीने सुरू झालेला हा महोत्सव दर वर्षी अशाच पद्धतीने साजरा करण्यात यावा, यासाठी लागणारे सर्व सहकार्य शिवेसेना करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी भोजन आणि उत्तम राहण्याची व्यवस्था कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी या वेळी राज्य सरकारला केली.
आज शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ शाहिस्तेखानाची बोटकापली, अफजलखानाचा कोथळा काढला, सुरतेवर स्वारी केली आणि आग्ऱ्यावरून सुटका केली असा इतिहास लोकांना माहिती आहे, मात्र शिवजी महाराज हे चांगले व्यवस्थापन गुरू होते. त्यांच्या काळात जलव्यवस्थापन, वनव्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात होते. त्यांनी शब्दकोश निर्माण केला, हा इतिहास लोकांपर्यंत पोहचेला नाही यापुढीला काळात शिवाजी महाराजांचा हा इतिहास पाठय़ पुस्तकांच्या माध्यमातून समोर आणला जाईल, रायगडचा इतिहास जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.