एकेकाळी शिवसेनेतच असलेले मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना शिवसेनेत परत घेण्यास कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तयारी दर्शविली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत का घेऊ नये,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगायला ते विसरले नाहीत.
शिवसेनेच्या बेरजेच्या राजकारणाने भाजप अस्वस्थ..
इस्लामपूर येथे रविवारी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यात उद्धव बोलत होते. ‘‘शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची दारावर नुसतीच ‘टकटक’ आहे की, ‘कटकट’ हे पाहून निर्णय घेतला जाईल. त्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चाही केली जाईल. मात्र सेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी तातडीने निर्णय घ्यावा,’’ असा सल्ला त्यांनी दिला.
केसरकर यांचा राष्ट्रवादीला रामराम
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या निष्क्रिय सरकारविरुद्ध प्रचंड जनक्षोभ असून राज्यातील सत्ताबदल ही केवळ महायुतीची गरज नसून भावी पिढीची गरज बनली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र प्रवेशासाठी विलंब झाला तर शिवसनिक निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. केवळ शिवसेनेच्या घरात येऊ का? असे विचारीत न बसता प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी तातडीने निर्णय घ्यायला हवा, अन्यथा वेळ गेल्यानंतर पश्चात्तापाची वेळ त्यांच्यावर येईल, असे उद्धव म्हणाले.
आघाडी सरकारने राज्याचे वाटोळे केले असून विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्यासाठी आघाडी सरकारला वेळ नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भाकरीच करपली आहे, तेथे ती फिरवून काय उपयोग होणार आहे, असा सवाल उद्धव यांनी विचारला.
 ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेनेचे दिवाकर रावते, सुभाष देसाई, कोल्हापूरचे आ. राजेश क्षीरसागर, डॉ. मिणचेकर आदींसह तीनही जिल्ह्य़ांतील पदाधिकारी उपस्थित होते.  
राष्ट्रवादीशी एकनिष्ठ- भुजबळ
नाशिक : ‘‘दोन दिवसांपासून आपल्याविषयी व्यर्थ वावडय़ा उठविल्या जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण या पक्षाशी एकनिष्ठ आहोत. पक्ष सोडून इतरत्र जाण्याचा आपण विचारही करू शकत नाही,’’ असा निर्वाळा छगन भुजबळ यांनी रविवारी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिला. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा त्यांनी जोरदार इन्कार केला. केंद्रातील मोदी सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. केवळ नियोजनातील सुसूत्रतेच्या बळावर देशात स्थापन झालेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. विधानसभा निवडणुकीत ही लाट चालणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.