राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळाने होरपळणाऱ्या उस्मानाबादला भेट देण्यास येत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचा ताफा सोबत घेऊन ते प्रशासकीय कामांचा आढावाही घेणार आहेत. दौऱ्यात जिल्ह्यातील एक हजार शेतकरी कुटुंबीयांना आíथक मदत, तसेच विविध शासकीय योजनांतर्गत लाभार्थ्यांना गायी-म्हशी व शेळ्यांचे वाटपही त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल ३५ वर्षांनंतर मोर्चा काढण्यासाठी उस्मानाबाद या दुष्काळी जिल्ह्याची निवड केली. मोर्चात त्यांनी एक महिन्याचा अल्टीमेटम देत मराठवाडय़ातील ५ जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याची दखल म्हणून की काय राज्य सरकार लगेच कामाला लागले आणि पंधरा दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री जिल्ह्याचा दौरा करून परतले. तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादला तब्बल तीन वेळा भेट दिली. पवार, फडणवीस यांच्या पाठोपाठ आता सेनेने दंड थोपटले आहेत.
मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर निघालेल्या उद्धव ठाकरे यांनीही आपल्या मंत्र्यांच्या फौजफाटय़ासह पहिल्यांदा उस्मानाबादचीच निवड केली आहे. उद्या (शुक्रवारी) ठाकरे सेनेच्या मंत्र्यांसह जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. राज्य सरकार मदतीच्या उपाययोजना आखत असताना सेनेने पक्ष म्हणून स्वतंत्र कार्यक्रम लावून भाजपच्या कार्यपद्धतीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच सेनेच्या विविध खात्यांचे मंत्री या दौऱ्यात सहभागी असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभही दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
सकाळी १० वाजता खासगी विमानाने उद्धव ठाकरे यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता हातलाई मंगल कार्यालय परिसरात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या चारा छावणीची ते पाहणी करतील. शेतकऱ्यांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार याप्रमाणे त्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात येणार आहेत.