‘उडे देश का आम आदमी’ ही संकल्पना आणि विभागीय जोडणीअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘उडान’ योजनेत नांदेडचा समावेश केल्यानंतर विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेस पक्षाने शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयोग गुरुवारी येथे केला.

वरील योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद व अन्य विमानसेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमल्याहून ‘व्हीडीओ िलक’ द्वारे गुरुवारी केले. या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने पंकजा मुंडे-पालवे व संभाजी पाटील निलंगेकर हे दोन मंत्री नांदेड विमानतळावर खास उपस्थित होते. स्थानिक खासदार या नात्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित राहणार असल्याचे बुधवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर भाजपपेक्षाही मोठे शक्तिप्रदर्शन करीत घोषणाबाजी केली.

काँग्रेसच्या राजवटीत सन २००८ साली नांदेडच्या सुसज्ज विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात येथून मुंबई तसेच नागपूर, दिल्लीसाठी नियमित विमानसेवा सुरू होती. अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर घरघर लागून ही विमानसेवा बंद पडल्याने मागील चार-पाच वष्रे येथील विमानतळ ओस पडले होते.

या पाश्र्वभूमीवर मोदी सरकारने एक नवी योजना आणताना नांदेडहून नव्याने विमानसेवा सुरू करण्याची घोषणा अलीकडेच केली होती. त्यानुसार हैदराबाद-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरूकरण्याची घोषणा झालेली असताना बुधवारी प्रत्यक्षात नांदेड-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात झाली. ही विमानसेवा सुरू होत असताना काँग्रेसने स्थानिक पातळीवर जाहिरात व पोस्टरबाजी करताना, आठ वर्षांपासून या विमानतळावर उपलब्ध असलेल्या रात्रीच्या विमानसेवेचा (नाइट लॅिण्डग) उल्लेख करून या सोयी-सुविधेचे श्रेय खासदार चव्हाण यांना बहाल केले. काँग्रेसची ही जाहिरात हास्यास्पद व शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपने गुरुवारी केली. पण नांदेड विमानतळावर झालेल्या कार्यक्रमावर सत्ताधारी पक्षापेक्षा काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथे खासदार अशोक चव्हाण यांचा जयजयकार सुरू केल्यानंतर मोजक्या संख्येने असलेल्या सत्ताधारी कार्यकर्त्यांनी मोदींचा गजर करीत काँग्रेसच्या घोषणांना प्रत्युत्तर दिले.

नांदेडहून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा यापूर्वी झाली असून तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा लांबणीवर पडली असली तरी मे च्या पहिल्या आठवडय़ापासून मुंबई व तिरुपतीला विमानाने जाता येईल, असे विमानतळावरील सूत्राने सांगितले.