१ नोव्हेंबरपासून मराठवाडय़ात दौरा
महाराष्ट्रात पावसाचा पत्ता नाही, पण घोषणांचा पाऊस आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर टक्का द्यावा लागतो. दुष्काळाने पिचलेला शेतकरी कोठून देणार, शेतकऱ्यांसाठी योजना खूप असल्या तरी त्याचा फायदा होत नसेल तर उपयोग काय, अशा शब्दात सरकारच्या कारभारावर हल्ला करून ‘आमची बांधीलकी सत्तेसाठी, नाही तर गोरगरिबांसाठी’ आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. बीड जिल्हा हा शिवसेनेसाठीही दुष्काळीच असल्याचे सांगत भरघोस मतदान केले असते, तर शिवसेनेचे सरकार आले असते आणि शेतकऱ्यांना भरभरून मदत केली असती, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद सुरू असताना उद्धव ठाकरे बीड येथे आले. त्यांच्या हस्ते जिल्ह्य़ातील एक हजार गरीब शेतकरी कुटुंबांना एक कोटीच्या मदतीचे वाटप करण्यात आले. भाषणाच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू झाल्याचे सांगत ते म्हणाले, ‘मनात चांगली भावना असेल तर निसर्गही साथ देतो’. मागच्या वर्षी विरोधी पक्षात असताना मराठवाडय़ाचा दुष्काळी दौरा करून सरकापर्यंत आवाज पोहोचवला होता. या वेळी सरकारमध्ये असल्याने जबाबदारी वाढल्याने इतर नेत्यांप्रमाणे मोकळ्या हाताने नाही तर मदत घेऊन आलो आहे. असे सांगून २००६च्या शासन अध्यादेशानुसार जेवढे कर्ज तेवढेच व्याज वसूल करावे, असे असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी, अशी भूमिका स्पष्ट केली.