लिंग परिवर्तनानंतर संभ्रमावस्थेत वावरणाऱ्या व समाजमान्यतेसाठी चाचपडणाऱ्या व्यक्तींसाठी शैक्षणिक पातळीवर ठोस निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्त्री व पुरुषांस आता स्वतंत्र दर्जा ठेवण्याचे निर्देश यूजीसीने  (विद्यापीठ अनुदान आयोग) दिले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचीही सूचना आहे.

शालेय पातळीवर स्त्रीलिंगी, पुरुषलिंगी व नपुंसकलिंगी, असे लिंगभेद शिकविले जातात. बदलत्या जनुकीय वातावरणात पुरुषांमध्ये स्त्रीतत्व किंवा स्त्रीमध्ये पुरुषतत्व अधिक प्रमाणात आढळून आल्यास शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल करून देहाची पूर्ण ओळख निर्माण करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अशा व्यक्ती तृतीयपंथी नव्हेत. बदलानंतर ती पूर्णत: स्त्री किंवा तो पूर्णत: पुरुष म्हणून ओळखला जावा, अशी लिंगबदल करवून घेणाऱ्यांची शरीरगत अपेक्षा असते. त्यांना स्वतंत्र दर्जा मिळावा का, या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने सकारात्मक दिले आहे. युजीसीचे सचिव डॉ.जसपाल संधू यांनी या विषयीचे निर्देश देशभरातील विद्यापीठांना दिले आहेत. यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्र.गो.येवले म्हणाले की, निर्णयामागे अशा व्यक्तींनी स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न असू शकतो. मुलींसाठी ज्याप्रमाणे प्रवेशात ३० टक्के आरक्षण असते, तसा फोयदा मिळेल का, याबाबत मात्र संदिग्धता आहे.