कोपर्डी अत्याचार खटला

कोपर्डी (तालुका कर्जत, जिल्हा नगर) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नंतर तिचा खून हा पूर्वनियोजित कट ठरू शकतो, असा युक्तिवाद या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयात केला. तसे पुरावेही त्यांनी सादर केले. दरम्यान, या खटल्यातील दोषारोप निश्चिती बुधवारी झाली नाही, त्यासाठी गुरुवारी सुनावणी होणार आहे.

राज्यभर पडसाद उमटलेल्या कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणात जितेंद्र बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (तिघेही रा. कोपर्डी) या तीन आरोपींविरुद्धचे दोषारोपपत्र गेल्या दि. ७ ला नगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवळे यांच्या न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत वकील निकम यांनी दोषारोप निश्चितीसाठी युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र यातील एक आरोपी नितीन भैलुमे याने आपल्याला गुन्हय़ातून वगळावे व जामीन मिळावा असे दोन स्वतंत्र अर्ज मंगळवारी न्यायालयात सादर केले. त्यावर बुधवारी म्हणणे मांडले जाणार होते, मात्र आजही त्यावर कामकाज होऊ शकले नाही.

बुधवारी विशेष सरकारी वकील निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले, की दि. १३ जुलैला कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेच्या तीन दिवस आधी या तिघा आरोपींनी पीडित मुलीची छेडछाड काढली होती. त्या वेळी तिने विरोध केल्यानंतर यातील आरोपी क्रमांक दोन व तीन अनुक्रमे संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी या मुलीच्या विरोधाचा बदला घेण्याचे सूतोवाच त्याच वेळी केले होते. त्यानंतरच दि. १३ जुलैला या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. हा कटाचाच प्रकार आहे. छेडछाडीची घटना लक्षात घेता हे तिन्ही आरोपी या कटात सहभागी होते, असा तर्क निघतो. ही घटना घडली त्या वेळी आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी या पीडित मुलीला खेचून पुढे नेले, याचाच अर्थ या गुन्हय़ातही त्याचा सहभाग होता, असा युक्तिवाद वकील निकम यांनी केला.

या गुन्हय़ातील आरोपी जितेंद्र शिंदे (क्रमांक एक) व नितीन भैलुमे (क्रमांक तीन) हे परस्परांचे मावसभाऊ आहेत व संतोष भवाळ (क्रमांक दोन) हा त्यांचा मित्र आहे, अशी माहिती वकील निकम यांनी न्यायालयात दिली. ते म्हणाले, या घटनेतील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र ही बाब संवेदनशील असल्याने त्यांची नावे आत्ताच स्पष्ट करता येणार नाहीत. या खटल्यात ७० साक्षीदार असून ते सर्व आम्ही तपासणार आहोत, असे सांगतानाच या खटल्याची सुनावणी लवकर व्हावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

या अत्याचाराच्या घटनेत भादंवि ३०२, ३७६, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी आरोपींनी नग्नावस्थेत पीडित मुलीला विरुद्ध दिशेला फरपटत नेले, असेही निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गुन्हय़ाचा पंचनामा, घटनास्थळाचा नकाशा, त्याचे पुरावेही त्यांनी न्यायालयात सादर केले. या सर्व गोष्टींचा लेखी तपशील न्यायालयाने मागितला. तो दुपारी सादर करण्यात आला. यावर गुरुवारी पुढील सुनावणी होणार असून त्याच वेळी दोषारोप निश्चित होऊ शकतील. आरोपी नितीन भैलुमे याने आपल्याला गुन्हय़ातून वगळावे व जामीन मिळावा, असे दोन स्वतंत्र अर्ज मंगळवारी न्यायालयात सादर केले. त्यावरही गुरुवारी म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे.

दोन आरोपींना सरकारी वकील

गुन्हय़ातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय पूर्वीच वकील संघटनेत झाला आहे. त्यामुळे दोघा आरोपींनी सरकारतर्फे वकील मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला असून, त्यानुसार वकील योहान मकासरे यांची जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ यांचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने खासगी वकिलाची नियुक्ती केली आहे.