८४ कोटींच्या प्रकल्पाला लाभणार जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमांतर्गत अलिबाग परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. जवळपास ८४ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य केले जाणार आहे. आपत्ती धोके निवारण कार्यक्रमातून राबवण्यात येणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प असणार आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत किनारपट्टीवरील भागात नसíगक आपत्तीचे धोके जास्त प्रमाणात असतात. वादळे, वारा, अतिवृष्टी, पूर यांसारख्या घटनांमुळे किनारपट्टीवरील भाग हा धोकादायक मानला जातो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर चक्रीवादळ धोके सौम्यीकरण प्रकल्प राबविला जात आहे. किनाऱ्यावर उद्भवणाऱ्या धोक्यांची तीव्रता कमी करणे आणि लोकांचे जीवन सुरक्षित करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. या अंतर्गत कोकण किनारपट्टीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात अलिबागमधील विद्युत वाहिन्यांचे काम भूमिगत करण्याचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध भागांत जवळपास २०० किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यात २२ केव्ही क्षमतेच्या ९८ किलोमीटर उच्च दाब क्षमतेच्या, तर १०५ किमीच्या लघुदाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्यांचा समावेश असणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. तर सबस्टेशनचे सक्षमीकरण, केबल टेिस्टग व्हॅन यांसारख्या कामांसाठी १३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. आपत्ती निवारण योजनेंतर्गत राज्यात राबविला जाणारा हा पहिलाच प्रकल्प असल्याने, जागतिक बँकेने या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करण्याचे मान्य केले आहे. या प्रकल्पामुळे पावसाळ्यात विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. याशिवाय वाहिन्या तुटून होणारे अपघात बंद होणार आहेत. त्याचबरोबर वीज चोरी, वीज गळती या प्रकारांनाही आळा बसू शकणार असल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे.
अलिबाग परिसरातील १८ हजार ग्राहकांना या प्रकल्पाचा फायदा होईल, प्रकल्पाच्या सूक्ष्म सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू असून येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकेल, असे अलिबाग महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्केअसे सांगितले.

हर्षद कशाळकर