कुख्यात गुंड अरुण गवळी कारागृहाच्या बाहेर आला, तर साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा अहवाल गृहखात्याने दिल्यामुळे विभागीय आयुक्तांनी येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेला अरुण गवळीचा पॅरोल नामंजूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १६ मार्च २०१५ त्याची रवानगी मुंबईवरून नागपूरच्या कारागृहात करण्यात आली. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीच्या मुलाचा ९ मे रोजी मुंबईला टर्प क्लब मेंबर्स एनक्लोसर रेसकोर्स, महालक्ष्मी या ठिकाणी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या समारंभाला त्याला जायचे असल्यामुळे पाच दिवसांपूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पॅरोलवर जाण्यासाठी अर्ज केला. मात्र, मुंबई पोलिसांनी शांतता भंगाचे कारण देत पॅरोलवर आक्षेप घेतला आणि तशा सूचना गृहविभागाने विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. गवळीचा पॅरोल नाकारल्यानंतर तो आता उच्च न्यायालयात जाणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. नागपूरच्या कारागृहातून पाच कैदी पळाल्यानंतर कारागृहात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या कारागृहात अरुण गवळी ज्या ठिकाणी आहेत तेथे सुरक्षा वाढविल्याची माहिती समोर आली आहे.
अरुण गवळी याचा मुलगा महेश याचा विवाह ९ मे रोजी कृतिका अहीर या नागपूरच्या मुलीशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका अरुण गवळीने विभागीय आयुक्तांना दिलेल्या अर्जाला जोडली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गृहविभागाने दिलेल्या निर्देशावरून त्याचा पॅरोल नाकारण्यात आला आहे.
मंत्री आणि विद्यमान आमदारही
या विवाहाच्या लग्नपत्रिकेवरील शेवटच्या पानावर अरुण गवळीने राज्य शासनाचे मंत्री आणि माजी नव्हे तर विद्यमान आमदार, असा स्वत:चा उल्लेख करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यावर आता विधिमंडळ आणि गृहविभाग त्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज केला त्यावेळी जोडलेल्या निमंत्रण पत्रिकेमुळे हा प्रकार उघडकीस आला. कधीकाळी आमदार राहिलेला अरुण गवळी मंत्री आणि आमदार कसा झाला, असाही प्रश्न
पडला आहे.