माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यावर रविवारी सकाळी घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष साजिद अली पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तलवार, सत्तूर, काठय़ा घेउन हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नायकवडी यांनी सांगितले.
माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे निवासस्थान मिरजेतील मध्यवस्तीत असणाऱ्या जवाहर चौकात आहे. आज रविवारी सदनिकेतील तळघरात असलेल्या कार्यालयात ते बसलेले असताना अचानकपणे ५० ते ६० जणांचा जमाव हातात तलवारी व काठय़ा घेउन अंगावर आला. मात्र याच वेळी इद्रिस नायकवडी यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आयेशा नायकवडी या जमावाला सामोऱ्या गेल्या. दंगा करीत हा जमाव घरात घुसला होता. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे लक्षात आले नाही.
याबाबत श्री. नायकवडी यांनी सांगितले, की या हल्ल्यामागे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष साजिद अली पठाण व त्यांचे भाऊ आणि कार्यकत्रे होते. हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला हेच समजले नाही. मात्र याबाबत शहर पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
नायकवडी आणि पठाण यांच्यामध्ये गेली १० वष्रे राजकीय संघर्ष धुमसत आहे. या कारणातून यामध्ये बऱ्याच वेळेला वादावादीही झाली आहे. मात्र या हल्ल्यामागे सांगलीत सुरू करण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या गाडा लावण्यावरून झालेला वादही अंतर्भूत असल्याचे समजते. यावरून एका खाजगी लग्नसोहळ्यात वादावादीही सकाळी झाली होती.
दरम्यान, याबाबत आज सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल नसल्याचे शहर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.