मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी मोबाईल शॉपी व सोन्याचांदीच्या दुकानसह बुलढाणा अर्बन बँक  शाखेत चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, बॅंकेत लावलेला सुरक्षा सायरन ऐनवेळी वाजल्यामुळे चोरटे पसार झाले. या प्रकरणी बॅंक व्यवस्थापकांनी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला ९ एप्रिलला तक्रार दाखल केली आहे. एकाच रात्री दोन दुकानासह बॅंक फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारच्या रात्री साडेबाराच्या सुमारास रोहिणखेड गावाबाहेरून आलेल्या अज्ञात चोरटय़ांनी सुरुवातीला बाजार परिसरातील एका सोनेचांदीच्या दुकानाला लक्ष्य करीत दुकानाच्या दरवाज्याचे खालच्या भागाचे कुलूप तोडले. दुकानाचा दरवाजा चोरांकडून उघडला गेला नाही. या दुकानाच्या दरवाज्याला वरच्या भागावरसुध्दा कुलूप होत.े ते चोरांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे हे दुकान वाचले. मात्र, चोरांच्या हाती काही लागले नाही. म्हणून त्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या मोबाईलच्या दुकानाकडे वळवून दोन मोबाईलवर डल्ला मारला. एवढय़ावर या चोरांचे समाधान न झाल्यामुळे ग्रामपंचायतजवळ असलेल्या रोहिणखेड येथील बुलढाणा अर्बन शाखेवर चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरांनी बॅंकेच्या समोरून प्रवेश न करता बॅंकेच्या मागील बाजूस जाऊन सुरुवातीला खिडकी तोडून आत प्रवेश केला. नंतर या चोरांनी लोखंडी चॅनल गेटचे कडी-कोंडे तोडल्यावर पुन्हा लाकडी दरवाजासमोर होता. या दरवाल्याला तोडण्यासाठी जेव्हा चोरांनी लोखंडी पाईपाचा वापर केला त्याच क्षणी बॅंकेने लावलेला सुरक्षा सायरन वाजल्यामुळे चोर पसार झाले.
सायरनचा आवाज ऐकून तंटामुक्ती अध्यक्ष भोपळे यांचे बॅंकेजवळ आले असता त्यांना तीन चोर जातांना दिसले. याबाबतची माहिती भोपळे यांनी तत्काळ धामणगाव बढे पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार सारंग नवलकरसह गश्तीदलावर कार्यरत असलेले, पोलीस उपनिरीक्षक देविदास चौधरी, भिवसने, संजय मिसाळ, कॉंस्टेबल ढाबेराव, उमेश भारसाखळे, शिवशंकर वायाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. तो मलकापूरचा रहिवासी असून व सध्या रोहिणखेड येथे नातेवाईकाकडे राहत असल्याची माहिती आहे. बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक पृथ्वीराज किसन गवळी यांच्यासह विभागीय व्यवस्थापक गोपालसिंग पाटील यांनी धामणगाव बढे पोलिस ठाण्याला दिली आहे. एकाच रात्री दोन दुकानासह बॅंक फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.