भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत; चलन तुटवडा जाणवणार; पंतप्रधानांची गादी कायम; आव्हानांमुळे बुरे दिन

तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ाच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ घटमांडणीच्या भाकितानुसार यंदा पाऊस सर्वसाधारण राहणार असून, अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. साधारण पण चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. चारा व पाणीटंचाईचे संकट राहणार असून, परकीय घुसखोरी वाढणार आहे. राजकारणात राजाची गादी अर्थात पंतप्रधान कायम राहणार असले तरी आíथक व इतर कारणांमुळे तणाव राहणार आहे. यावर्षी  अनेक आव्हाने राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी महाराज वाघ यांनी हजारोंच्या उपस्थितीत हे भाकीत व्यक्त केले. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आíथक व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे २८ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली. जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठवर वसलेल्या भेंडवळ गावात गेल्या तीनशे वर्षांपासून घटमांडणीची परंपरा चालत आली आहे. वाघ घराण्यात ही परंपरा असून, चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरू केली आणि आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरू आहे. शेतकऱ्यांना या मांडणीच्या भाकितावर विश्वास आहे. शेतकरी या मांडणीवर पीक पाण्याचे नियोजन करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षय्य तृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात घटाची मांडणी करण्यात आली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात आले. त्यानुसार पावसाळ्यातील पहिला महिना जूनमध्ये पाऊस कमी होणार आहे. जुल महिन्यात पाऊस साधारण राहणार असून पीक चांगले येईल. ऑगस्ट महिन्यात सर्वात चांगला पाऊस होईल, तर सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्यानंतर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीचे पीक यंदा चागले येणार आहे. ज्वारीचे पीक चांगले येणार असून, पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक चांगले होईल व भावात तेजीमंदी राहील. मुंग-उडीदाचे पीकही चांगले तर, तिळाचे पीक साधारण असून, त्याची नासाडी संभवते. बाजरी चांगली, जवस ठीक, गहू चांगला व भावात तेजी राहणार आहे. खरीप हंगाम चांगला व रब्बी हंगामही साधारणत: चांगलाच राहणार आहे, असेही भाकितात वर्तवण्यात आले आहे. पिकांवर रोगराई राहणार असल्याचेही म्हटले आहे. चारा व पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला.   देशात आíथक तणाव राहील व संकट येईल. घटातील सुपारी पानावर बाजूला पडलेली होती व पान दुमटून त्यावर माती होती. त्यामुळे राजा पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम राहणार आहे. पानावर माती आल्याने पंतप्रधानांना हे वर्ष बरे नसून ‘बुरे दिन’ संभवते. त्यांच्यावर अनेक राजकीय आणि आíथक संकटे येतील, असेही भाकितात व्यक्त करण्यात आले आहे. करंजीचे तुकडे झाल्याने देशावर आíथक संकट ओढवणार आहे. पृथ्वीवर अतिवृष्टी, भूकंप, महापूर आदी संकटे येतील. देशाच्या संरक्षण खात्यावर ताण येईल. परकीय घुसखोरीचे संकट देशासमोर असेल. त्यामुळे सन्यासमोरील आव्हाने वाढतील व ते सक्षमपणे मुकाबला करतील, असे भेंडवळच्या भविष्यवाणीत स्पष्ट करण्यात आले आहे. आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या, तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढ्याच विश्वासाने जपली जात आहे, त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.

घटमांडणीची विशिष्ट परंपरा

भेंडवळच्या घटमांडणीची एक विशिष्ट परंपरा आहे. त्यानुसार घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मुग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जाते. मध्यभागी खोल खड्डा करून त्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विडय़ाच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. त्या घटामध्ये होणाऱ्या बदलानुसार दुसऱ्यादिवशी भाकीत वर्तविण्यात येते.