भाजपच्या वाजपेयी सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली होती, याची आठवण देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील गारपीटग्रस्तांसाठी आघाडी सरकारमधील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी न मागता ४ हजार कोटी रुपये दिले अशी तुलना करत, कोणते सरकार विश्वास ठेवण्यालायक आहे, हे शेतक-यांनी ओळखावे अशी बोचरी टीका केली. शेतक-यांचा पक्ष हीच राष्ट्रवादीची, आघाडीची ओळख असल्यानेच ही मदत मिळाली, असाही दावा त्यांनी केला.
नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिल्ली गेट भागात आयोजित केलेल्या संयुक्त प्रचार सभेत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी सुळे, राजळे, वाकचौरे, पालकमंत्री मधुकर पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांची उघडय़ा वाहनातून, शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या पदयात्रेत शहरातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील लोक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
गारपीटग्रस्तांच्या मदतीचे राजकारण करायचे नाही, असे सांगतच खा. सुळे यांनी वाजपेयी व मनमोहन सिंग यांच्या मदतीची तुलना केली. शेतकरी संकटात असताना मते मागणे अडचणीचे वाटत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘ते’ केवळ जातिधर्माचे, जातिपातीचे राजकारण करतात. आम्हाला देशात परिवर्तन घडवायचे आहे. देशात स्थिर सरकार असेल तरच अशी मदत देणे शक्य होते. आम्ही जात-पात सांगून मते मागणार नाही, विकासकामावरच मते मागणार. परिवर्तनातून नवा भारत घडवण्याचे काम आघाडीच करेल, असेही सुळे म्हणाल्या.
मुंडे यांना रोज वेगवेगळय़ा जिल्हय़ात वेगवेगळय़ा खात्याचे मंत्री झाल्याची स्वप्न पडू लागल्याने ते घोषणाबाजी करू लागले आहेत, अशी टीका पिचड यांनी केली. आघाडी सरकारच्या विकासकामांमुळे भाजपमधील इतरांचे चेहरे पडले आहेत त्यामुळे मोदींचा चेहरा लावून फुगा फुगवला जात आहे, अशी टीका मंत्री थोरात यांनी केली. महाराष्ट्रात कोणत्याही लाटेचा परिणाम होणार नाही. सोशल मीडियाचा वापर करून मोदींचा व्यक्तिकेंद्रित प्रचार सुरू आहे, त्यात भाजपला वाजपेयींचा विसर पडलेला आहे, अशी टीका मंत्री विखे यांनी केली.
अनुपस्थितांचीच चर्चा अधिक
दोन्ही काँग्रेसच्या जिल्हय़ातील छोटय़ामोठय़ा नेत्यांची मोठी गर्दी होती. ती पाहून खा. सुळे यांनी जिल्हय़ात आघाडीचे खरे मनोमिलन पाहावयास मिळाले, असा उल्लेख केला. कार्यकर्त्यांना मात्र कोण उपस्थित आहे, यापेक्षा दक्षिणेतील कोण, कोण अनुपस्थित आहे याबद्दलच अधिक उत्सुकता होती. आ. अरुण जगताप, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या गैरहजेरीने कुजबूज झाली. माजी खासदार प्रसाद तनपुरे उपस्थित असल्याचे जाहीर केले जात होते, प्रत्यक्षात मात्र ते कोणालाच दिसले नाहीत. आ. बबनराव पाचपुते यांनी आता उमेदवाराबद्दल गडबड संपलेली आहे, जिरवाजिरवी राहिलेली नाही, छोटय़ामोठय़ांचा प्रश्नही मिटलेला आहे, कारण आता तुमच्या आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे, असे स्पष्ट केले.
गरम भाकरी, पंजा आणि घडय़ाळ…
पंजा आणि घडय़ाळाला मते दिली तरच रोज गरम भाकरी जेवताना मिळेल, नाहीतर उपाशी बसावे लागेल, अशी भुणभुण महिलांनी मतदान होईपर्यंत रोज घरी सुरू करावी, असे आवाहन खा. सुळे यांनी केले. कमी पैशात यशस्वी प्रचार करण्यासाठी मंत्री आबा यांनीच आपल्याला हा कानमंत्र दिला, तो आता आपण राजळे व वाकचौरे यांना देत आहोत, असे त्यांनी सांगताना त्यांनी आबा साधे, सरळ, स्वच्छ प्रतिमा असलेले आहेत, असे कौतुकही केले. त्यावर मंत्री थोरात यांनी घरची गरम भाकरी मिळण्यासाठी आधी आबांना ढाबे बंद करायला सांगा, असा टोला लगावला.