पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडणे, अतिवेगाने वाहने चालविणे आदी प्रकारांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची चोवीस तास नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यांची मदत घेऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मार्गावर चार ठिकाणी ड्रोन कॅमेरे तनात करण्यात येणार असून, त्यांचे प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले.

द्रुतगती मार्गावर अतिवेगाने वाहन चालविणे, मार्गिकेची शिस्त मोडणे, चुकीच्या पध्दतीने वाहनांना ओलांडून पुढे जाणे यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यात कित्येकांना जीवही गमवावा लागला आहे. अपघातांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होते. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. या सर्व घटना रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करूनही वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे यश येत नसल्याने यापुढे ड्रोनच्या साहाय्याने बेशिस्तीचे चित्रीकरण करून खालापूर व उस्रे टोल नाक्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

ड्रोनच्या कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक व सर्वेक्षण महामार्ग पोलीस अधीक्षक तांबे, महामार्ग पोलीस निरीक्षक अजय बारटक्के, सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, एम. आर. काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हे काम पुण्यातील एरियल मॅपर्स हे करणार असून, या कारवाई मोहिमेत एरियल मॅपर्सच्या पथकासह महामार्ग पोलिसांचा समावेश असणार आहे. एक ड्रोन कॅमेरा चार किलोमीटपर्यंतच्या अंतराचे चित्रीकरण करणार आहे. सध्या चार ठिकाणे हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.