वैतरणाच्या दुषित पाणीप्रश्न

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात मार्च महिन्यात काही व्यक्तींनी विषारी औषध टाकल्याची खुद्द पाटबंधारे विभागाने तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे.

इतकेच नव्हे तर, मत्स्योत्पादनासाठी धरणात काही वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या वनस्पती टाकल्या जातात. त्यामुळे दुषित झालेल्या पाण्याने विविध आजार उद्भवत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहे.

बाजारात चांगले दाम मिळणाऱ्या झिंगा प्रकारातील मासे उत्पादीत करण्यासाठी चाललेल्या खटाटोपाने धरणातील कोंबडा हा मूळ मासाही नामशेष पावला. शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. या घडामोडींनी मुंबईकरांना पिण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

पाणी दुषित होण्यास अनधिकृत मत्स्य व्यवसाय कारणीभूत ठरल्याची तक्रार वैतरणा, वणली, धारगाव व आसपासच्या ग्रामस्थांनी केली आहे. झिंगा माशाचे अधिक उत्पादन मिळावे याकरीता धरणात सातत्याने विशिष्ट वनस्पती आणून टाकली जाते. तसेच काही औषधांची फवारणी केली जाते. यामुळे पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढले. त्याला विशिष्ट प्रकारचा वास येतो. या पाण्याचा वापर करणाऱ्या गावांतील बालकांना जुलाब व तत्सम आजार तर मोठय़ा व्यक्तीला पित्ताचा त्रास होत आहे.

वैतरणास्थित आरोग्य केंद्राने हे पाणी पिण्यालायक नसल्याचे ग्रामपंचायतीला सूचित केल्याचे ग्रामस्थ धर्मराज खोडके यांनी सांगितले. या दुषित पाण्याने कृषी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. स्थानिकांनी पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारवाई झाली असती तर पाणी दुषित करणारा मत्स्य व्यवसाय आधी बंद झाला असता, याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

धरणात विषारी औषध

महत्वाची बाब म्हणजे, ३० मार्च २०१७ रोजी जलाशयात कोणीतरी विषारी औषध टाकल्याचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्याही निदर्शनास आले होते. वैतरणा धरण उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी त्याबाबत घोटी पोलीस ठाण्यात पत्र देऊन वैतरणा धरणात विषारी औषध टाकले गेल्याची माहिती दिली होती. या बाबत सखोल चौकशी करावी, जेणेकरून मुंबई महापालिकेला पिण्यासाठी होणाऱ्या पाणी पुरवठय़ात धोका निर्माण होणार नाही, यासाठी कार्यवाही करावी, अशी विनंती केली होती. या तक्रारीवर आजतागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.