राज्य सरकारच्या वतीने संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार लातूर जिल्हय़ातील बडूर (तालुका निलंगा) गावच्या वन व्यवस्थापन समितीला जाहीर झाला. पाच लाख रुपये धनादेश व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते वनाधिकारी बी. एन. कदम, वन परिक्षेत्र अधिकारी कामाजी पवार, जी. एस. साबळे, निलंगा वन परिमंडल अधिकारी बी. बी. मुदाळे व वन समितीचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुंडल (जिल्हा सांगली) येथे हा पुरस्कार स्वीकारला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर वन विभागाने संत तुकाराम महाराज वनग्राम पुरस्काराची घोषणा केली. वनसंवर्धन व वनसंरक्षण, तसेच वन्यजीव संरक्षणात अव्वल कामगिरी बजावणाऱ्या गावांसाठी २००७पासून हा पुरस्कार सरकारच्या वतीने दिला जात आहे. लातूर जिल्हय़ातील शिराळा, लासोणा, अंकोली, हत्तीबेट व आता बडूर ही गावे या पुरस्कारास पात्र ठरली आहेत.
या अभियानांतर्गत वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, वनचराई, कुऱ्हाडबंदी, वन्यजीव संरक्षण, वन व्यवस्थापन, श्रमदान आदी उपक्रम राबविले जातात. उपक्रमांत गावकरी व महिलांचा सहभाग, तसेच वन, वन्यजीव व पर्यावरण संरक्षणात गावची जागृती आदींची दखल घेत राज्यस्तरीय समितीने बडूर गावाची पुरस्कारासाठी शिफारस केली होती. वनाधिकारी कामाजी पवार यांचे नियोजन व वरिष्ठांचे मार्गदर्शन, तसेच ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक परिश्रमाचे फलित म्हणजे बडूर गावास मिळालेला वनग्राम पुरस्कार होय. या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोटे, वनाधिकारी मुद्दमवार आदींनी अभिनंदन केले.