राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १४० व्या जयंतीनिमित्त गुरुवारी करवीरनगरीत विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. शासकीय कार्यालय, विविध पक्ष, संघटना यांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्यावतीने  सकाळी साडेआठ वाजता कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोज कुमार शर्मा, महापौर सुनिता राऊत यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. शहरातील विविध शिक्षण संस्था, आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थानी भव्य शोभा यात्रा काढली होती. या शोभायात्रेमध्ये शाहू महाराजांच्या जीवनावरील प्रसंग दाखवणारे चित्ररथ आणि जिवंत देखावे सहभागी झाले होते.
कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू छत्रपतींचा चित्रमय जीवनपट साकारण्याचा शुभारंभ आज झाला. तलरंगात साकारलेली शाहूंची प्रतिमा जन्मस्थळी ठेवण्यात आली होती. त्यावर मान्यवरांच्या सह्या घेऊन चित्रनिर्मितीच्या कार्याचा प्रारंभ झाला. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, गृहराज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते. फौंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव यांनी उपक्रमाची माहिती दिली. कार्यवाह रियाज शेख यांनी जन्मस्थळाच्या आठवणींना उजाळा दिला.
जिल्हा न्यायालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या हस्ते झाले. बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे, उपाध्यक्ष के.व्ही. पाटील, सचिव राजेंद्र मंडलिक, अॅड्. पूजा कटके आदी उपस्थित होते. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड या मुख्य बाजार आवारातील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासक डॉ. महेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सचिव संपतराव पाटील, उपसचिव विजय नायकल आदी उपस्थित होते.