केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना लग्न सोहळ्यास्थळी आणण्यासाठी ५० चार्टर विमानांचा वापर केला जातो आहे. विशेष म्हणजे देशभरातून नागपूरला जाणाऱ्या विमानांची ३ आणि ४ डिसेंबरची तिकीटे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत नाहीत. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

नितीन गडकरी यांची कन्या केतकीचा विवाह सोहळा नागपुरात संपन्न होतो आहे. या सोहळ्याला तब्बल १० हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. नागपूरमधील वर्धा रोडवरील राणी कोठी इथे या भव्यदिव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडकरींची कन्या केतकी आदित्य कासखेडीकर याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये गडकरींचा मोठा मुलगा निखिल याचा विवाह संपन्न झाला होता. त्यावेळीही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याच मुलीच्या लग्नासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मान्यवर नागपूरला येत आहेत. गडकरींचा होणारा जावई आणि कन्या केतकी हिचा नवरा आदित्य अमेरिकेत स्थायिक असून, तो फेसबुकमध्ये कार्यरत आहे.

उद्धव ठाकरे सरसंघचालकांच्या भेटीला

नितिन गडकरी यांच्या मुलीच्या विवाहासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, खासदार हेमामालिनी, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी नागपूरमध्ये येत आहेत. याच व्हीव्हीआयपींसाठी ५० चार्टर विमाने नागपूरमध्ये दाखल होत आहेत.नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने मात्र हे वृत्त फेटाळले आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या पाच डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरूवात होते आहे. त्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ आणि विविध पक्षाचे आमदारही नागपूरमध्ये दाखल होत आहेत. हे सर्व सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चांगले संबंध असल्यामुळे अनेक राजकीय नेते, विविध अधिकारी हे सुद्धा आवर्जून विवाह सोहळ्याला येतील.