शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीने शनिवारी आणखी एकाचा बळी घेतला. सावेडी रस्त्यावर झोपडी कॅन्टीनजवळ दुपारी झालेल्या अपघातात वासुदेव तथा विलास पुरुषोत्तम भारदे यांचे जागीच निधन झाले.
साखरेचे पोते घेऊन जाणाऱ्या मोलमोटारीने (आरजे ०२ व्हीए ५७७५) भारदे (वय ६०, रा. वैदूवाडी, नगर) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. भारदे मोपेडवर शहरातून घराकडे जात होते.
सावेडीतील माऊली संकुलासमोर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात भारदे यांच्या शरीराचे अनेक तुकडे झाले, हे दृश्यच मोठे हेलावणारे होते. त्यांचे अवयव रस्त्यावर इतस्तत: विखुरले. अपघात झाल्यानंतर येथे मोठी गर्दी जमा झाली, त्यामुळे रहदारीही काही वेळ ठप्प झाली. तोफखाना पोलिसांनी मालमोटारचालक इस्माईलखान अब्दुल्लाखान (राजस्थान) याला अटक केली. भारदे यांनी काही काळ एसटी महामंडळात नोकरी केली व नंतर काही काळ पत्रकारिता केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.