औरंगाबादच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या काही दिवसांत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या १ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून दोन आरामबस ऑगस्टमध्ये सुरू व्हाव्यात, असे प्रयत्न केले जात असल्याची माहिती  जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.
अजिंठा व वेरूळ येथील लेणींचे सौंदर्य पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी आरामबसची सोय व्हावी, अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. एस.टी. महामंडळाने व्हॉल्वो बस द्याव्यात, या साठी जिल्हा नियोजन आराखडय़ातून निधी मंजूर करण्यात आला. एक बस वेरूळ व बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला येथे, तर दुसरी बस अजिंठा येथे पर्यटकांना घेऊन जाईल. शहरात तीनचार ठिकाणी या बसला थांबे दिले जाणार आहेत. काही मोठय़ा हॉटेल्समधूनही पर्यटकांना नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या बसचे तिकीट ऑनलाइन असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. बसमध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून मार्गदर्शकाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याने पर्यटकांचा ओघ वाढेल, असेही विक्रमकुमार म्हणाले.
येत्या वर्षांत पर्यटनाला चालना मिळेल, असे अन्य उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत. विशेषत: धाडसी पर्यटनाला वाव मिळेल, अशा उपक्रमांबरोबरच एअरबलूनची सोय निर्माण करून देता येईल का, याची चाचपणी करण्यात आली. ‘स्कायवॉल्ट’ कंपनीबरोबर चर्चाही झाली. मात्र, हा व्यवसाय या भागात चालेल का, या विषयी शंका असल्याने अजून कोणी पुढे आले नसल्याचेही ते म्हणाले. पर्यटनाला चालना मिळावी, म्हणून या वर्षी वेगवेगळ्या कारणाने बंद पडलेला वेरूळ महोत्सवही सुरूकेला जाण्याची शक्यता आहे.
या दोन बसमुळे पर्यटकांची सोय होईल, असे चित्र आहे. सध्या येणाऱ्या पर्यटकांना स्वतंत्र गाडीनेच जावे लागते. अन्यथा एस.टी. महामंडळाच्या लाल डब्यात बसावे लागते. मात्र, चांगली सोय नसल्याने पर्यटकांची तारांबळ उडते. या पाश्र्वभूमीवर ऑगस्टपासून हा प्रकल्प तातडीने अंमलबजावाणीत यावा, असे प्रयत्न सुरू आहेत.