साहित्य-संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या येथील ज्येष्ठ लेखिका भावना दत्तात्रय भार्गवे (८४) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व दोन मुली असा परिवार आहे. हं. प्रा. ठा. महाविद्यालयातील जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख तथा लेखिका डॉ. वृंदा भार्गवे यांच्या त्या मातोश्री होत.
सुमारे ३६ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या भावना भार्गवे यांचा महाराष्ट्रातील विविध शहरांमधील साहित्य चळवळ व सांस्कृतिक कार्यक्रमांशी निकटचा संबंध आला. आशयपूर्ण कथा, कादंबरी व चरीत्र याव्दारे त्यांनी लिखाणाची वेगळी शैली मांडली. ‘पद्मश्री दादासाहेब गायकवाड’ या त्यांच्या चरित्रात्मक खंडास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गतीमान युगातील गवईसाहेब’, ‘रात्रदिन आम्हा’, ‘मुख्यमंत्री (अनुवाद)’, ‘मृत्यूपासून अमृताकडे’, ‘शिवदर्शन – छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटय़ांसाठी चरित्र’, ‘दिवस सणासुदीचे’, ‘मुलगी वाढवायचीय’, ‘आनंदाची कारंजी’, ‘नगरसेविकांची सामथ्र्यशीलता’ असे विपूल लेखन त्यांनी केले. अभ्यासपूर्ण भाषणांसाठी राज्यभर प्रवास करणाऱ्या भार्गवे यांनी हजारो व्याख्याने, परिसंवाद व चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला.
उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर शासकीय कन्या शाळेतून त्या निवृत्त झाल्या. सांस्कृतिक-साहित्यिक चळवळीशी संबंधित असणाऱ्या कलायतन संस्थेच्या त्या संस्थापक होत्या. या संस्थेमार्फत आयोजित बालगंधर्व अमृत महोत्सवात भार्गवे यांनी स्वत: ७५ हजार रुपयांची देणगी संकलीत करून बालगंधर्वाकडे सुपूर्द केली होती. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त, साहित्य भूषण समितीचे कार्यवाह यांसह लोकहितवादी मंडळ व सार्वजनिक वाचनालय या संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली. सोमवारी सकाळी येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, शैक्षणिक, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.