सध्या सोशल मिडीयावर हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सशस्त्र दहशतवादी एकमेकांना आलिंगन देत आनंद साजरा करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारावाईत मारल्या गेलेला कमांडर बुरहान वानी याने सोशल मिडीयावर सुरू केलेल्या मोहीमेचा भाग म्हणून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या तब्बल साडेचार मिनिटांच्या व्हिडिओत १२ दहशतवादी एका बागेत एकमेकांना आलिंगन देताना आणि हास्यविनोद करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात जम्मू-काश्मीरमधील पोलिसांकडून हिसकावलेल्या आयएनएसएएस रायफल्सही दिसत आहेत. तरूणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर करणारा दहशतवादी म्हणून बुरहान वानीची ओळख होती. ८ जुलै रोजी भारतीय सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान मारला गेला होता.

दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अन्य एका व्हिडिओत संघटनेचा कमांडर झाकीर रशिद भट उर्फ मुसा तरूणांना पोलिसांची शस्त्रे हिसकावून संघटनेत सामील होण्याचे आव्हान करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांडून शस्त्रे हिसकावण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आतापर्यंत दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या तब्बल ६७ रायफल्स पळवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुरक्षायंत्रणा आणि पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या आयएनएसएएस आणि कॅरेबियन रायफल्सचा समावेश आहे.