मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (‘झिम्मा’ आत्मकथा), यशवंतराव गडाख (‘अंतर्वेध’ व्यक्तिचित्रण) व डॉ. महेंद्र कदम (‘आगळ’ कादंबरी) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी सोलापुरात या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण होणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. पुरस्कार समितीचे संस्थापक, उद्योगपती नवरतन दमाणी यांनी पुरस्कार मानकऱ्यांची घोषणा बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
यंदाच्या वर्षी प्रकाशित झालेल्यांपैकी १६० पुस्तकांचे परीक्षण करून त्यातून तीन पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी कोणतेही प्रस्ताव मागविले जात नाहीत, तर पुरस्कार समिती स्वत:हून पुरस्कार मानक ऱ्यांचा शोध घेते. पुरस्कार वितरण सोहळा येत्या १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात संपन्न होणार आहे.
या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत, तर ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा. निशिकांत ठकार हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
पुरस्कार निवड समितीवर डॉ.गीता जोशी, शरदकुमार एकबोटे, प्रा.राजेंद्र दास व प्रा. विलास बेत यांनी काम पाहिले.
यापूर्वी प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख, सुरेश भट, प्राचार्य रा. रं. बोराडे, जयवंत दळवी, माधवी देसाई, अरुण साधू, य. दि. फडके, लोकनाथ यशवंत, वसंत बापट, प्रिया तेंडुलकर, मारूती चित्तमपल्ली, गोविंद तळवलकर, मंगेश पाडगावकर, अरुण टिकेकर, वसंत कानेटकर, रवींद्र पिंगे, राजन गवस, सुदेश लोटलीकर, बाबा भांड, नीरजा, रा. चिं. ढेरे, मधु मंगेश कर्णिक, अनंत मनोहर, रंगनाथ तिवारी, ह. मो. मराठे, डॉ. अनिल अवचट, विष्णू सूर्या वाघ, डॉ. गो. मा. पवार. आसाराम लोमटे, आशा अपराद आदींना दमाणी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस पुरस्कार समितीचे कार्यवाह अरविंद कुलकर्णी यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.