कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या पार्थिवावर त्यांच्या वाईतील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरगाव येथे हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात विलास शिंदेंना अखेरचा निरोप देण्यात आला.
बुधवारी लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान विलास शिंदे यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात खारमध्ये पेट्रोलपंपाजवळ ड्यूटीवर असताना विलास शिंदेंनी एका अल्पवयीन दुचाकीस्वाराला अडवले होते. विनाहेल्मेट गाडी चालवत असल्याने शिंदेंनी त्याला अडवले होते. या दुचाकीस्वाराने फोनकरुन स्वतःच्या भावाला घटनास्थळी बोलावून घेतले. त्याचा भाऊ अहमद कुरेशीने शिंदे यांच्या डोक्यात बांबूने प्रहार केला आणि शिंदे गंभीर जखमी झाले. शिंदे यांची नऊ दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज बुधवारी अपयशी ठरली. बुधवारी त्यांच्या निधनानंतर शिंदे राहत असलेल्या वरळीतील पोलिस कॉलनीत शोककळा पसरली.
कूपर रुग्णालयात शिंदे यांच्या शवविच्छेदन केले. शिंदेंच्या इच्छेनुसार त्यांचे डोळे दान करण्यात आले. यानंतर  गुरुवारी शिंदे यांचे पार्थिव त्यांच्या वाईतील मूळगावी दाखल झाले. हजारो ग्रामस्थांनी शिंदे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिंदे यांचा मुलगा दिपेशने त्यांना मुखाग्नी दिला. अंत्यसंस्काराल जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या स्थानिक नेते उपस्थित होते. दरम्यान, शिंदे यांच्या निधनानंतर आज वरळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांनी वरळी बंदचे आवाहन केले होते. या बंदला स्थानिकांनी पाठिंबा दिला. सकाळपासून परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.