ताडोबाच्या बफरझोनमध्ये पर्यटकांसाठी प्रवेशबंदी असणारी गावे ठरवताना अधिकाऱ्यांनी एका पंचतारांकित हॉटेलला फायदा मिळावा म्हणून अगदी जंगलात असलेले भामडेळी गाव बंदीच्या यादीतून वगळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गावाला वगळावे म्हणून मंत्रालयातून दबाव होता, अशीही माहिती समोर आली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासभोवती असलेले जंगल बफरझोन म्हणून ओळखले जाते. बफरझोनचा हा परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर झाला आहे. या झोनमध्ये येणाऱ्या २३ गावांमध्ये पर्यटकांसाठी बंदी घालण्याचा निर्णय या व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीने नुकताच घेतला. या गावांची यादी निश्चित करण्याचे काम या समितीवर सोपवण्यात आले होते. समितीने ठाणेगाव, जुनोना, देवाडा, आडेगाव, आगरझरी, चोरगाव, निंबाळा, माहमी, हळदी, खुटवंडा, डोनी, झरी, पांगडी, पिंपळहेट्टी, मोहर्ली, सीतारामपेठ, कारवा, पांढरवणी, चिचघाट, आंबेझरी, घोसरी, मामला व फुलेझरी या गावांचा समावेश ‘नो गो झोन’मध्ये केला. यातून भामडेळी हे गाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
भामडेळी हे गाव सीतारामपेठला अगदी लागून आहे, तसेच ताडोबाच्या कोअर झोनपासून १० किलोमीटर अंतराच्या आत आहे. या गावाच्या एका बाजूला ताडोबाचे जंगल, तर दुसऱ्या बाजूला इरई धरण आहे. या जंगलातून रोज अनेक प्राणी पाण्यासाठी धरणावर येतात. हे ठावूक असून सुद्धा मंत्रालयातून आलेल्या दबावामुळे या गावाला प्रवेशबंदीतून वगळण्यात आले. या गावाला लागून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या एका वन्यजीवप्रेमीची जमीन आहे. हा वन्यजीवप्रेमी परदेशी पर्यटकांना ताडोबा दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या वन्यजीवप्रेमीने काही दिवसांपूर्वी ही जमीन एका नामांकित हॉटेल कंपनीला विकली. सध्या या कंपनीकडून येथे पंचतारांकित रिसॉर्ट उभारले जात आहे. हे गाव प्रवेशबंदीच्या यादीत समाविष्ट झाले असते तर ही रिसॉर्टची उभारणी तातडीने थांबवावी लागली असती. हे टाळण्यासाठी या वन्यजीवप्रेमीने मंत्रालयातील अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक सल्लागार समितीवर दबाव आणून भामडेळी गाव या यादीतून वगळण्यास भाग पाडल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, समितीने प्रवेशबंदीसाठी सुचवलेल्या गावांची यादी आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे.

धक्कादायक प्रकार
स्थानिक सल्लागार समितीचे सचिव व ताडोबाचे क्षेत्रसंचालक जी.पी. गरड यांना यासंदर्भात विचारणा केली असता हा निर्णय झाला त्या बैठकीला आपण हजर नव्हतो, असे  त्यांनी सांगितले. मात्र, असे घडले असेल तर ते अतिशय धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.