स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने पंढरीत गेल्या ५० वर्षांपासून सावरकरप्रेमी मंडळ यांच्यावतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारी व्याख्यानमाला यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारपासून (दि. २०) सावरकर वाचनालय येथे सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सावरकरप्रेमी मंडळाचे अध्यक्ष वा. ना. उत्पात यांनी दिली आहे व्याख्यानमालेचे व सावरकरप्रेमी मंडळ संस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.व्याख्यानमाला शुक्रवारपासून (दि. २०) २८ मे पर्यंत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता सावरकर वाचनालय येथे होणार आहे. २० मे रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त आमदार रामहरी रूपनर तसेच इतिहासकार गोपाळराव देशमुख यांचे मल्हारराव होळकर या विषयवार व्याख्यान होऊन व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. २१ मे रोजी भाग्यनगरचे डॉ जयंतराव कुलकर्णी यांचे ज्ञान विज्ञाननिष्ठ सावरकर, २२ मे रोजी पुणे येथील डॉ प्रसन्न परांजपे यांचे नाडी विज्ञान, २३ मे रोजी अभय भंडारी यांचे गांधी, सावरकर व आजचा भारत, २४ मे रोजी डॉ बहार कुलकर्णी यांचे डॉक्टर – रुग्ण संबंध, २५ मे रोजी चिपळूण येथील डॉ सचिन उत्पात यांचे गर्व से कहो हम भारतीय है, २६ मे रोजी पनवेल येथील डॉ मंजिरी वैद्य यांचे शेक्सपिअर, अशा विविध विषयावर व्याख्यानं होणार आहेत. २७ मे रोजी सोशल मीडिया अ‍ॅक्टिव की ओवर अ‍ॅक्टिव या विषयवार पंढरीतील निमंत्रित वक्त्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. समारोप २८ मे रोजी पाटण तहसीलदार रवीन्द्र सबनीस यांच्या प्रशासन व सामान्य माणूस या विषयाने होणार आहे.