आगामी निवडणुकांमध्ये ६ महानगर पालिका आणि १२ जिल्हा परिषदांवर आपला पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे  शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी जाहीर केले आहे. २० तारखेला पुण्यातील शनिवार वाडा येथे आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले जाणार असल्याचे मेटेंनी सांगितले. आमच्या पक्षाच्या माध्यमातून बहुजणांना नवीन पर्याय मिळणार आहे असे ते  नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

शिवछत्रपती स्मारकाबद्दल…..

शिवछत्रपती स्मारकाबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही वेळोवेळी चर्चा केली आहे. या प्रकल्पाबद्दल आवश्यक ते सहकार्य आम्ही केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शिवछत्रपती स्मारकावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर मेटे यांनी, राज ठाकरे हा माणूस थेअरोटिकल असून ते प्रॅक्टिकल नाहीत म्हटले. राज यांना मुंबईतील या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांनी मागावी. मी त्यांना देईल. राज ठाकरे यांचे शिवस्मारकाबद्दलचे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. याविषयी जे राजकारण होत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर बोलताना राज यांनी ताळतंत्र सोडले आहे. स्मारकाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात कोणाची जर शंका असेल तर त्यांनी आम्हाला विचारावी. परंतु चुकीची वक्तव्ये करू नये असेही ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चातून काय निष्पन्न झाले…….?

काही गोष्टी आज धाडसाने बोलण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळापासूनच्या चळवळी जर सोडल्या तर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा इतका मोठा मोर्चा राज्यात कोठेही झाला नाही. मात्र आम्ही यातून काय साध्य केले आहे? असा प्रश्न पडतो. हा मोर्चा योग्य दिशेने जात असताना तो भरकटला. काही मराठा समाजातीलच ज्येष्ठ नेत्यांनी या मोर्चाची दिशा भरकटवली आहे. विविध प्रश्नांवर समाज कोठेही एकजूट दिसत नाही. या मोर्चानंतर इतर समाज आमच्या विरोधात एकत्र येत असून मराठा समाज राज्यात एकटा पडत चालला आहे असेही ते म्हणाले. पूर्वी बारा बलुतेदारांना मराठा समाजाचा आधार वाटायचा. ही जागा आता भीतीने घेतली आहे. अजूनही वेळ गेली नसून जे समाजात स्वतःला मोठे समजतात ते जर इतरांचे भले करू शकत नसतील तर वाईट तरी करू नका असेही ते यावेळी म्हणाले.

समृद्धी मार्ग

समृद्धी मार्ग शासनाचा महत्वाकांक्षी व विकासाभिमुख प्रकल्प आहे. पण राज्याचा विकास करताना शेतकरी भकास होणार नाही याची काळजी राज्य शासनाने घेतली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.