खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन

राज्यात मुदतपूर्व पोटनिवडणुका जाहीर झाल्यास शिवसेना निवडणूक लढण्यास तयार आहे, असे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढणार किंवा कसे, हा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हेच घेतील, असे ते म्हणाले.

राज्यभरात शिवसेना संपर्क अभियान सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राज्यभर फिरत आहेत. कोकणातही ते २३ जून रोजी एक दिवसाच्या दौऱ्यावर येतील, असे खासदार राऊत म्हणाले.

मुदतपूर्व पोटनिवडणुका शिवसेनेला नको आहेत, पण त्या लादल्या गेल्यास शिवसेना निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागली आहे. विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणमध्ये शिवसंपर्क अभियानाचे वेळापत्रक निश्चित केले आहेत. सर्वच भागात शिवसेना पोहचत आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारमधील मंत्री बेग याने जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध केला आहे. त्याचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी शिवसेना निश्चितपणे आंदोलन उभारेल. कर्नाटक सरकारची नाकाबंदी करण्यासाठी शिवसेना मागेपुढे पाहणार नाही. कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र असे नाव कोरण्याचे आंदोलन राज्यात सुरू झाले आहे, असे सांगून खासदार राऊत यांनी जय महाराष्ट्राने कर्नाटक सरकारचे डोके ठिकाणावर आणू असे ते म्हणाले.

सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ातील बीएसएनएल यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञांची नोकर भरती करावी अशी मागणी केली आहे. सिंधुदूर्ग सर्वाधिक ग्राहक असणारा जिल्हा असूनही बीएसएनएलने मोबाईलसेवा सुरळीत केलेली नाही पण येत्या ऑक्टोबपर्यंत आणखी नवीन ८० मोबाईल टॉवर्स उभारण्याचा संकल्प आहे, असे खासदार राऊत म्हणाले.

बीएसएनएलमधील कार्यालयीन कंत्राटी २०५ कामगारांचे वेतन गेले तीन महिने देण्यात आले नाही. बीएसएनल व ठेकेदार यांनी अनियमीतपणा दाखविला आहे. त्यामुळे यामध्ये दोषी आढळणाऱ्यां विरोधात करावाई करण्याची मागणी आहे. ठेकेदाराने बिले सादर करण्यात अनियमितता दाखविली आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केल्याचे खासदार राऊत म्हणाले.

सिंधुदूर्ग जिल्ह्य़ातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला शंभर कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील. पालकमंत्री दिपक केसरकर यांची निधी आणण्याची कामगिरी उत्तम आहे, असे खासदार राऊत म्हणाले. या वेळी रुपेश राऊळ, विक्रांत सावंत, संजय पडते, शब्बीर मणीयार आदी उपस्थित होते.