आपल्या साहित्यकृतीमध्ये जर वाङ्मयचौर्य सिद्ध झाले, तर आपण लेखणी थांबवू असे पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले. जगण्याच्या वाटचालीत ज्यावेळी ठिणगी पडते, त्यावेळीच कसदार साहित्याची निर्मिती होते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मकर संक्रातीच्या पाश्र्वभूमीवर सदानंद साहित्य मंडळाने आयोजित केलेल्या ७४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझ्या साहित्यिक कृतीबाबत मध्यंतरी चर्चा झाली. एका कादंबरी लेखनाच्या सत्यतेबाबत काहींनी संशय व्यक्त केला. मात्र ते माझे अस्सल लेखन असून यामध्ये वाङ्मयचौर्य जर सिद्ध झाले तर आपण लेखन संन्यास घेऊ. यानंतर पुढे कधीही लेखणी हाती घेणार नाही.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला थोर साहित्यिकांची परंपरा आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा काठची कसदार माती अग्रेसर आहे. साहित्यात विदर्भाचा दिसणारा अनुषेश पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांनी भरून काढला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी वेगवेगळे विषय हाताळले तर अधिक दर्जेदार साहित्य मराठी शारदेच्या अंगणात फुलेल. पानिपतसाठी मी देश पालथा घातला. माणसे शोधण्याचा प्रयत्न केला. ही माणसे मी पानिपतच्या पानातून रेखाटली म्हणूनच त्याला वाचकप्रियता लाभली. समाजाने सराटसारखी कलाकृती जरूर पाहावी. त्यातील कलेचा आस्वाद जरूर घ्यावा, मात्र सराट होऊ नये. जाती-पातींच्या भ्रामक कल्पना दूर सारून निकोप समाजासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.

यावेळी शहाजी सूर्यवंशी, पुरुषोत्तम जोशी, प्रा. प्रदीप पाटील, वसंत केशव पाटील, प्रा. संतोष काळे, सरपंच संजना यादव, उपसरपंच विजय पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कवी सुधांशू पुरस्कार राजेंद्र टिळे, ओंकार चिटणीस यांना तर सुरेश कुलकर्णी पुरस्कार शहानवाज मुल्ला, प्रा. विठ्ठल सदामते यांना देण्यात आला. आमणापूरच्या मोहन आवटे यांच्या खुन्नस या कादंबरीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.