लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून झालेल्या उपदेशाच्या डोसामुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी, कार्यशाळेतून काढता पाय घेतला. पुस्तकी ज्ञानाच्या स्वरुपात झालेला हा बाळबोध डोस कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला दिसला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती सत्वशीला चव्हाण यांच्या पुढाकारातून युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या कार्यशाळेला सुरुवातीला गर्दी झाली होती, मात्र त्यामध्ये युवक कार्यकर्ता शोधावा लागत होता.
शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात शनिवारी दिवसभर झालेल्या या कार्यशाळेला ‘निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता कार्यशाळा’ असे नाव देण्यात आले होते व संघटितपणे कसे काम करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले, मात्र कार्यक्रमावर गटबाजीचे सावट होते. त्यामुळेच उपस्थित केवळ विखे गटाचेच पदाधिकारी व कार्यकर्ते होते. पक्षातील थोरात गटाने पाठ फिरवली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत ओगले यांच्या संयोजनाचा हा परिणाम असावा.
कार्यक्रमास श्रीमती सत्वशीला चव्हाण उपस्थित होत्या. मात्र कार्यशाळेस कृषीमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार असल्याचे निरोप दिले गेल्याने, त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी अधिक होती. विखे येणार नाही, हे स्पष्ट होताच व कार्यक्रमाचे स्वरुप पाहून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लगेच काढता पाय घेतला. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी केवळ भोजन वेळेत भेट दिली व ते लगेच निघून गेले. शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा तर फिरकलेच नाहीत. भोजनानंतर बहुसंख्य कार्यकर्ते निघून गेले होते. सभागृहातील साउंड व स्क्रिन सिस्टिमही व्यवस्थित नसल्याचा वैतागही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघात यश मिळवण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे लागेल हे सांगताना श्रीमती चव्हाण, विनय आवटे, सामंत व पी. के. माळी यांनी संघटित काम कसे करावे, पक्षाचे काम लोकांपर्यंत कसे पोहचवावे, सोशल मीडियाचा वापर कसा करावा, लोकांमध्ये कसे मिसळावे याची माहिती दिली. पक्षाची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रोजेक्टरच्या स्क्रिनवर ‘धैर्यवान कार्यकर्त्यांसाठी-एक सुवर्णसंधी’ हे वाक्य वारंवार झळकवले जात होते.
माहिती देण्यास नकार
श्रीमती सत्वशीला चव्हाण यांची पत्रकारांनी भेट घेतली असता त्यांनी कार्यशाळेचा उद्देश, स्वरुप सांगण्यास नकार दिला. कार्यशाळेचे निरोपही केवळ एसएमएसवर दिले गेले होते, त्यामुळे केवळ विखे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीलाच पत्रकार व छायाचित्रकारांना मज्जाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रम पक्षांतर्गत आहे, पत्रकारांना भाजपच्या बैठकांची माहिती दिली जाते का? मग आम्ही का द्यावी, असे चव्हाण यांचे मत होते.