राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास पाण्याला मुकावे लागेल, अशी धमकी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी गुरूवारी पार पडलेल्या दुस-या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्या रात्री बारामतीच्या मतदारांना दिल्याची माहिती उघड झाली.
मात्र, अजित पवार यांनी गावकऱ्यांना अशाप्रकारची कोणतीही धमकी दिली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. याबद्दल  अजित पवार यांनी, विरोधकांनी केलेले आरोप खोटे आहेत, माझा आवाज काढून बदनामीचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपल्यावर चुकीचे आरोप केल्याप्रकरणी ‘आप’चे उमेदवार सुरेश खोपडे यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.  

सुप्रिया सुळेंना मतदान करा नाहीतर पाण्याला मुकाल; अजित पवारांची धमकी

मासाळवाडी गावातील एका सभेत अशाप्रकारची धमकी दिल्याच्या आशयाचा एक व्हिडिओ उपलब्ध असल्याचे बारामती मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी वडगाव पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवताना म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याबाबत तक्रार दाखल करून घेतलेली नाही. दरम्यान, मतदानाच्या धावपळीत खोपडे यांच्या तक्रारीकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही, असं उप पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले. आम्ही या तक्रारीची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई करू, असंही ते पुढे म्हणाले.
अंधारामुळे या व्हिडिओमधील चेहरा हा स्पष्ट दिसत नसला तरी आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत आहे. ‘उद्या मतदान आहे, या गावातील समस्यांबाबत कुणीही भाष्य करण्याचा प्रयत्न केल्यास गावाला होणारा पाण्याचा पुरवठा बंद करण्यात येईल. सुप्रिया सुळे यांना पूर्ण बारामती मतदारसंघातून पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे या गावातील मतांमुळे माझी बहिणीच्या जिंकण्यावर अथवा हरण्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि तुम्ही कुणाला मतदान केलेत हेसुध्दा मला मतदान यंत्रावरून कळेल. यानंतरही तुम्ही उध्दटपणा करणार असाल, तर मी तुम्हाला मदत करू शकणार नाही.’
पाण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले आहेत. हे फक्त माझ्यामुळेच शक्य झाले आहे. मी शेखी मिरवत नाहिए, परंतू खुद्द ब्रम्हदेवसुध्दा इथपर्यंत पाणी आणू शकत नाही, अशा आशयाचे वक्तव्य अजित पवार यांनी या व्हिडिओमध्ये केल्याचे निदर्शनास येत आहे.
केवळ दोन महिन्यांमध्ये गावात पाण्याची पाईपलाईन टाकली जाईल असे एक तरूण या व्हिडिओमध्ये नमूद करत असल्याचे दिसत आहे. मात्र, आठ वर्षांनंतरही पवारांनी आपले वचन पूर्ण केलेले नाही. यानंतर पवारांच्या समर्थकांनी सदर तरूणाला दाबण्याचा प्रयत्न केल्यावर, आपल्याला समाधानकारक उत्तर मिळविण्याचा अधिकार आहे असं तो तरूण म्हणाला. त्यानंतर पवारांनी आपल्या समर्थकांना त्या तरूणाला सभेच्या ठिकाणापासून दूर नेण्याचे आदेश देऊन, या गावाला अजिबात पाणी मिळणार नाही असे म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात येत होते. तर, सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय निलेश राऊत म्हणाले की, त्या आता प्रतिक्रियेला उपलब्ध होऊ शकत नाहीत.
भाजप आणि आम आदमी पक्षाने यासंदर्भात अजित पवारांवर कारवाईची मागणी केली असून निवडणूक अधिका-यांशी सुध्दा संपर्क साधला आहे.