मराठवाडय़ातील आठपैकी ६ लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीचे उद्या (गुरुवारी) मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. १ कोटी २६ लाख ८७६ मतदार त्यांचा खासदार निवडणार आहेत.
निवडणूक रिंगणात १५१ उमेदवार असून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील या दिग्गजांसह प्रत्येक मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. प्रशासनासह पोलिसांची यंत्रणाही सज्ज असून मराठवाडय़ात २२९ मतदान केंद्रांमध्ये चोख बंदोबस्त देण्यात आला आहे. मतदान शांततेत व निर्भयतेच्या वातावरणात व्हावे, या साठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. हिंगोलीत राजीव सातव हे प्रमुख उमेदवार रिंगणात असून काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे.