साईबाबांची शपथ मोडणाऱ्या खासदार वाकचौरे यांनी यापूर्वी संस्थानच्या कार्यालयात बसून दुकानदारी व एजंटगिरी केली. त्या माध्यमातून हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू येथे संपत्ती गोळा केली. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनालाही हजर राहात नसत, त्यामुळे त्याचे पार्सल हैदराबाद पाठवा, असे आवाहन आमदार अशोक काळे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत आमदार काळे बोलत होते. भाजपचे हेरंब औटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस शिवसेनेचे संपर्कप्रमुख मिलिंद मिर्लेकर, लहू कानडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, विजय वहाडणे, रिपब्लिकन पक्षाचे विजय वाकचौरे, अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष भीमा बागूल, महेंद्र त्रिभुवन, नगरसेविका भारती कांबळे, अरुण पाटील, डॉ. महेश क्षीरसागर, राजेंद्र देवकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, वाकचौरे यांनी सेनेत राहणार अशी शपथ घेतली, पण मी उद्धव ठाकरे यांना हा माणूस लबाड आहे, फसवणूक करील असे सांगत होतो. आता विश्वासघातामुळे वाकचौरेंवर लपूनछपून प्रचार करण्याची वेळ आली. गावोगाव त्यांच्यावर काळे पाणी, शाई, अंडी फेकून लोक रोष व्यक्त करीत आहेत. त्यांची पात्रताच नव्हती, मात्र तरीही शिवसेनेने खासदार केले. सेवानिवृत्तीनंतर लोकसभा लढविण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आला कुठून, असा सवाल करून वाकचौरेंनी संस्थानच्या कार्यालयात बसून साईबाबांच्या तिजोरीवर डल्ला मारला. परराज्यात मालमत्ता जमवली. दिल्लीला कमी आणि हैदराबाद, चेन्नईला ते अधिक वेळा जातात. आता हे पार्सल कायमचे हैदराबादला पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
लोखंडे म्हणाले, वाकचौरेंच्या पाठीशी तीन मंत्री, दोन आमदार असले तरी माझ्या पाठीशी असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. ही लढाई आता लोखंडे विरुद्ध वाकचौरे नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. मला निवडून देऊन मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी लहू कानडे, अशोक गायकवाड, प्रकाश चित्ते, बबन मुठे, विजय वाकचौरे, हेरंब औटी, सचिन बडदे, देवकर यांची भाषणे झाली. अतुल वढणे यांनी सूत्रसंचालन केले.