कोकण किनारपट्टी व मराठवाड्यालाही परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. चिपळूण, खेड, रत्नागिरी, लांजा आदी भागात शुक्रवारी रात्रभर पाऊस पडत होता. तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली आदी परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसाचा रेल्वे व रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली होती. ती दूर करण्यात आली असून एका मार्गाने धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने महामार्ग रात्री एक वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद होता. सुकेळी खिंडीतील दरड हटवण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. रोहा अष्टमी येथील कुंडलिका नदीवरील पुलावर रात्रभर पाणी होते. ते सकाळी सात वाजल्यापासून ओसरल्याने प्रशासनाने भिसे खिंड मार्गे रोहा-अष्टमी अशी महामार्गावरील वाहतूक चालू करण्यात आल्याचे सांगितले. तर कोकण रेल्वे मार्गावर चिखल साचल्याने येथील रेल्वे वाहतूक सुमारे ३ ते ४ तास उशिराने धावत आहे. आरवली आणि संगमेश्वर स्टेशनदरम्यान रुळावर पाणी आल्याने मांडवी एक्स्प्रेस आरवली रोड स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. कोकण परिसरात अजूनही अनेक भागात पाऊस पडत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सरस्वती नदीला मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने राजापूर गावांत पाणी शिरले आहे. या गावाचा संपर्क तुटला आहे. गावात सुमारे ५०० लोक अडकले आहेत. माजलगाव तालुक्यातील उमरी, पारगावाचाही संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यातील ४६ महसूल मंडलामध्ये अतिवृष्ठी झाली आहे. या पावसामुळे बीडच्या माथी अनेकवर्षांपासून दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडला परतीच्या पावसाने वरूणराजाने भरभरून दान दिले आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे.