अनेक हिंसक कारवाया करून पोलिसांची झोप उडवून देणारा जहाल नक्षली व बयाणार दलमचा कमांडर रसूल ऊर्फ अनिल शोरी यास वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. एरिया कमिटीचा सदस्य असलेल्या रसूलवर पाच लाख रुपयांचे बक्षीस आहे.
छत्तीसगढमधील कोंडा व गडचिरोली जिल्ह्य़ात हिंसक नक्षली कारवाया केल्याबद्दल त्याच्यावर सायबर गुन्हे दाखल झालेले आहेत. तो उपचारार्थ वर्धा जिल्ह्य़ात आल्याची खबर गुप्तचर यंत्रणेने वर्धा पोलिसांना दिली होती. त्यानुसार शोध सुरू केल्यावर कमांडर रसूल हा सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात आढळून आला. शंकर पिच्छा या नावाने तो ३१ मे रोजी या दवाखान्यात दाखल झाला होता. ८ जूनला तो पुन्हा तपासणीसाठी आला असताना त्याला परत ११ जूनला पुन्हा बोलावण्यात आले. १२ जूनला डॉक्टरांनी त्याच्या हर्निया व्याधीवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेमुळे तो बेशुद्धावस्थेत असतानाच वर्धा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो बोलण्याच्या मनस्थितीत आल्यावर चौकशी करण्यात आली. त्यानंतरच त्याची खरी ओळख पटली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज दिली. त्याला रुपग्णालयात आणणाऱ्या राजू व महेश या युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज पुन्हा त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्यावर गडचिरोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याने त्याला गडचिरोलीच्या पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे. पकडण्यात आलेल्या दोन युवकांपैकी एकाला गडचिरोलीला रवाना करण्यात आले असून दोघेही गडचिरोलीचेच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी रसूल यास सेवाग्रामलाच का दाखल करण्यात आले, याविषयी नेमके उत्तर मिळाले नाही. यापूर्वी अशा काही नक्षली म्होरक्यांनी या दवाखान्यात उपचार घेतले आहेत का, या दृष्टीनेही चौकशी होत आहे.
३० वर्षीय रसूलने प्रामुख्याने छत्तीसगडमधील नारायणपूर परिसरात हिंसक कारवायांनी चांगली दहशत निर्माण केली असल्याची नोंद आहे.