काळाच्या प्रवाहात लोप पावलेल्या नदीचे पात्र पुन्हा जिवंत करण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रयोग लातुरात हाती घेण्यात आला आहे. कालौघात गडप झालेल्या तावरजा नदीचे सुमारे २५ किलोमीटरचे पात्र गाळमुक्त करून नदीला जलसंजीवनी देण्याचे कार्य ५० टक्के लोकसहभागातून सुरू करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जनजागृती अभियानांतर्गत होत असलेल्या या कामासाठी अंदाजे ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात २१ गावांमध्ये जलजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या वर्षी लातूर जिल्हय़ातील कातपूर, बाभळगाव व शिरूर अनंतपाळ या ३ ठिकाणी जलजागृती अभियानांतर्गत लोकसहभागातून उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या गावांची व परिसरातील भूगर्भाची पाणीपातळी वाढली. सुमारे १७५ कोटी लिटर पाणी अडले गेले. त्याच्या किमान चौपट पाणी जमिनीत मुरले. या परिसरातील लोकांची पाण्याची समस्या बऱ्यापैकी मिटली. लातूर परिसरातील अनेक गावांमधील लोकांनी या ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधला व आर्ट ऑफ लििव्हगच्या मंडळींकडे आमच्या गावात तुम्ही उपक्रम सुरू करा, आम्ही ५० टक्के सहभाग देऊ, अशी तयारी दाखविली. सुमारे शंभर गावच्या लोकांनी या बाबत संपर्क साधला. त्यातूनच पहिल्या टप्प्यात २१ गावांत जलजागृतीचे काम सुरू करण्यात आले.
लातूर तालुक्यातील शिऊर, पेठ, तसेच औसा तालुक्यातील आलमला, नागरसोगा, भादा या ठिकाणी हे काम सुरू झाले. आतापर्यंत ८ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च झाले आहेत. शिऊर येथील तावरजा नदीचे पात्र २ किलोमीटर लांब, ६० मीटर रुंद व अडीच मीटर खोल करण्याचे काम वेगाने सुरू आहे. औसा तालुक्यातील आलमला येथे दीड किलोमीटर अंतराचे काम असून, नदीपात्राची रुंदी ५० मीटर व खोली अडीच मीटर आहे. आणखी साडेतीन किलोमीटरचे काम पूर्ण होणे बाकी आहे. तावरजा धरणापासून शिवणीच्या मांजरा नदीच्या संगमापर्यंत २५ किलोमीटर तावरजा नदीपात्राचे रुंदीकरण हाती घेतले आहे. या कामाचा अंदाजित खर्च ५ कोटी रुपये आहे. लोकसहभागातून ते पूर्ण केले जाईल. महाराष्ट्रातील हा पहिलाच पथदर्शक प्रकल्प असल्याचे आर्ट ऑफ लििव्हगचे प्रमुख मकरंद जाधव यांनी सांगितले.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथे नाला रुंदीकरणाचे काम सुरू आहे. १० मीटर रुंदी, अडीच मीटर खोली व एक किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले. आणखी दीड किलोमीटर लांबीचे काम बाकी आहे. भादा येथे १२ मीटर रुंद, ३ मीटर खोल असे नाला सरळ करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत साडेतीन किलोमीटर काम पूर्ण झाले. आणखी साडेचार किलोमीटर काम बाकी आहे. लातूर तालुक्यातील भोईसमुद्रा, कातपूर टप्पा २ व गंगापूर, औसा तालुक्यातील बुधडा, भुसणी, हासेगाव, बाणेगाव, तळणी, हरेगाव, रेणापूर तालुक्यातील समसापूर, लखमापूर, रामवाडी व सिंदगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ टप्पा दोन व आनंदवाडी, तसेच चाकूर तालुक्यातील भाटसांगवी व सुगार अशा २१ गावांत या अभियानांतर्गत कामे घेतली आहेत. जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था व साखर कारखान्यांचा सहभागही घेतला जाणार आहे. काम सुरू करताना ग्रामस्थांनी निम्मा लोकवाटा आधी द्यायचा व आर्ट ऑफ लििव्हगच्या पुढाकाराने उर्वरीत निम्मा खर्च केला जातो.
नदीपात्रात पुन्हा गाळ साचू नये, या साठी दोन्ही बाजूंना बांबूची लागवड केली जाणार आहे. पात्रात भूजल सर्वेक्षण विभागातर्फे िवधनविहिरीही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. या कामाला तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, सिंचन व जिल्हा परिषदेचे अभियंते सहभाग देत आहेत. नदीचे पात्र वाढवताना मूळ पायाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. जिल्हय़ात दरवर्षी सुमारे १५० टीएमसी पावसाचे पाणी पडते. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणाची पाणी साठवणक्षमता केवळ तीन टीएमसी आहे. पावसाचे पडलेले पाणी अडवले गेले तर त्याचा लोकांना चांगला लाभ होणार आहे.
या अभियानानंतर पाण्याचा जपून वापर कसा करावा? सेंद्रीय शेती, त्यासाठी खते, कीटकनाशके गावातल्या गावात तयार करण्यासाठीही शेतकऱ्यांचे गट स्थापन करून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. लातूर तालुक्याच्या शिऊर गावात तावरजा नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. अॅड. त्र्यंबकदास झंवर, रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, साई शुगरचे अध्यक्ष राजेश्वर बुके, शिऊर गावचे ग्रामस्थ अॅड. मनोहरराव गोमारे आदी उपस्थित होते.