राज्यातील सर्वच पाणस्थळांवर या वर्षी प्रथमच स्थानिक व स्थलांतरित पाणपक्ष्यांची प्रगणना डिसेंबरचा तिसरा रविवार आणि जानेवारीतील दुसऱ्या रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यानुसार रविवार, २१ डिसेंबरला पहिली पाणपक्षी गणना सर्वच जिल्ह्य़ात होणार आहे. त्यादृष्टीने पक्षीतज्ज्ञ, पक्षी अभ्यासक आणि पक्ष्यांसाठी कार्यरत संस्थांची मदत वनखात्याने
घेतली आहे.
निसर्गाच्या यंत्रणेचे सूचक म्हणून पक्ष्यांकडे पाहिले जाते. पर्यावरणाच्या बदलाचे संकेत देणारे हे घटक तिन्ही ऋतुंमध्ये हजारो किलोमीटरचे अंतर पार करतात. मात्र, गेल्या काही वर्षांंत या स्थलांतरित पक्ष्यांची मोठय़ा प्रमाणावर शिकार होत आहे. पाणवठे आटल्यामुळे त्यांच्या भटकंतीवरही परिणाम झाला आहे. शिकारीच्या घटनांमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यामुळे निसर्गाची यंत्रणा, पर्यावरणातील बदलाचे संकेत मिळणेसुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावेळी पाणपक्ष्यांची गणणा करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्यांदाच होणाऱ्या पाणपक्षी गणनेकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. रविवारी होणाऱ्या या प्रगणनेत वनपरिक्षेत्रातील पाणस्थळांवरील स्थानिक व स्थलांतरित पाणपक्ष्यांची नोंद घेण्यात येईल. वनाधिकाऱ्यांसह क्षेत्रीय कर्मचारी, पक्षीप्रेमी, मानद वन्यजीव रक्षक व पक्ष्यांसंबंधी माहिती असणारे यात सहभागी होतील.
या प्रगणनेनंतर पाणवठय़ांवरील स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांविषयी अचूक नोंद घेतली जाईल, तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धनासाठी उपाययोजना करता येईल. पक्ष्यांच्या प्रजाती आणि संख्येविषयी आकडेवारी उपलब्ध होईल. कोणत्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तसेच कोणत्या पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ होत आहेत, याचीही माहिती मिळेल. या सर्व माहितीनंतर वनखात्याकडून नष्ट होणाऱ्या प्रजातींविषयी आणि त्यांचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी उपाययोजना आखण्यात येईल. नागपूर आणि शहराच्या आसपास सुमारे ३०-३२ पाणवठे असे आहेत की, ज्या ठिकाणी हमखास विविध पक्षी आढळून येतात.
राज्याच्या वनखात्याकडून होणाऱ्या या पाणपक्षी गणनेची जबाबदारी नागपूर जिल्ह्य़ात बर्ड्स ऑफ विदर्भ या ग्रुपकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर वनखात्याचे उपवनसंरक्षक डी.एम. भट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन प्रगणनेत पक्षीप्रेमी व अभ्यासकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.