नगरसेवकांच्या दबावामुळे महिनाभराच्या रजेवर गेलेले महापालिकेचे जलअभियंता मनीष पवार सोमवारी पुन्हा कामावर हजर झाले. पवार यांनी सेवा बजावण्यास सुरुवात केली असली तरी टक्केवारीचे प्रकरण कसे वळण घेणार आणि या विषयावरून ताणलेले नगरसेवक-अधिका-यांचे संबंध कसे राहणार या नव्या चच्रेला तोंड फुटले आहे.
कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ठेकेदाराकडून टक्केवारीचा व्यवहार करावा यासाठी पवार यांच्याकडे काही बडय़ा नगरसेवकांनी तगादा लावला होता. त्यातूनच काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील काम पाणीपुरवठा विभागाकडून काढून घेऊन बांधकाम विभागाकडे देण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली होती. महापालिकेतील या प्रकारामुळे पदावरून दूर होण्याचा निर्णय पवार यांनी घेतल्याची चर्चा महापालिकेत रंगली होती.
मनीष पवार यांनी अत्यंत नेटके नियोजन करीत पाणीपुरवठा विभागास शिस्त लावली. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ठेकेदाराकडून काही लाखाचा मलिदा कारभा-यांनी मिळवला होता. तथापि ठेकेदाराकडून आणखी भरीव रक्कम मिळावी यासाठी पवार यांनी मध्यस्थी करावी, असा तगादा काही नगरसेवकांनी लावल्याची पाणीपुरवठा विभागात चर्चा सुरू होती. सांडपाणी केंद्र व थेट पाईपलाईन योजनेतील या अर्थपूर्ण घडामोडींकडे पवार यांनी दुर्लक्ष केले. तोडपाणी करण्यास मदत करीत नसल्याने सातत्याने त्यांच्यावर निष्क्रिय असा ठपका ठेवण्यात येऊ लागल्याची भावना झाल्यानेच पवार यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणाची दखल घेऊन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरसेवक आणि अधिकारी यांची बठक घेऊन समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अधिका-यांचे गरसमज दूर करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या पाश्र्वभूमीवर पवार पुन्हा कामावर रुजू झाल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या चच्रेला पूर्णविराम मिळालेला आहे. आज जल अभियंता मनीष पवार हे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याबरोबरच महापालिकेत दाखल झाले.