नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्य़ांतून होत असलेल्या विरोधाला न जुमानता राज्य शासनाने मराठवाडय़ास नऊ टीएमसी (९ हजार दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. २८ नोव्हेंबरला मुळा तर २९ नोव्हेंबर रोजी दारणा व भंडारदरा धरणांतून प्रत्येकी तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याकरिता करावयाच्या उपायांवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी येथे चर्चा करून आवश्यक ती खबरदारी घेण्यावर शिक्कामोर्तब केले. स्थानिक पातळीवरील प्रखर विरोध लक्षात घेऊन प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
नाशिक व अहमदनगर या जिल्ह्य़ांतील तीन धरणांमधून जायकवाडी धरणासाठी आणखी नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. शुक्रवारी त्या संदर्भात लेखी आदेश नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद पाटबंधारे विभागास प्राप्त झाल्यानंतर सोमवारी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. याआधी मराठवाडय़ासाठी अहमदनगर जिल्ह्य़ातील भंडारदरा-निळवंडे धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्या वेळी आणि त्यानंतरही औरंगाबादला पाणी देण्यास नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ातून तीव्र विरोध केला जात आहे. मराठवाडय़ास पाणी देण्यावरून संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच स्थानिकांना डावलून पाणी दिल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा नाशिक जिल्हा पाणीप्रश्न कृती समितीने दिला आहे. या सर्व मुद्दय़ांचा विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरला मुळा धरणातून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ नोव्हेंबरला दारणा व भंडारदरा धरणांतून प्रत्येकी तीन टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. तत्पूर्वी, दारणा व गोदावरी, मुळा, प्रवरा नदीपात्रांतील जलपरी काढणे, पाणी सोडण्याच्या कालावधीत या परिसरातील वीजपुरवठा खंडित करणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांत पाणी अडविले जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. या शिवाय, पाणी सोडण्याची प्रक्रिया राबविताना आवश्यक तो पोलीस बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी तैनात केला जाणार आहे.
दारणा व भंडारदरा धरणांतून प्रत्येकी सहा हजार क्युसेक्स तर मुळा धरणातून ७,५०० क्युसेक्स पाणी सोडले जाईल. वेगवेगळ्या धरणांतून सोडले जाणारे हे पाणी प्रवरा संगमाच्या पुढे नेवासा येथे एकत्र येईल. तेव्हा नदीपात्रातील हे पाणी १९,५०० क्युसेक्स असेल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ांतून पाण्याचे मार्गक्रमण होताना ठिकठिकाणी त्याचे मापन केले जाणार आहे.
संभाव्य हानी टाळून आणि स्थानिक विरोधाचा सामना करत औरंगाबादला पाणी पोहोचविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे.