अवकाळी पावसाने जिल्हय़ात पुन्हा जोर लावल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे निलंगा तालुक्यात फळपिकांचे मोठे नुकसान झाले. कोतलशिवणी गावात आपला मुलगा व दोन बैलांसह गोठय़ात आश्रयाला थांबलेल्या दत्तू यशवंता कोरे (वय ६०) यांच्यावरच थेट वीज कोसळली. यात दत्तू कोरे यांच्यासह दोन बल जागीच जळून खाक झाले. कोरे यांचा मुलगा अशोक (वय ३५) गंभीर जखमी झाला. गुरुवारी दुपारी तीन-साडेतीनच्या दरम्यान निलंगा तालुक्यात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे अनेक गावांत घरावरील पत्रे उडाले, तसेच झाडे पडली. बुधवारी सायंकाळी उदगीर, चाकूर व देवणी भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : उदगीर तालुक्यातील मोघा ४०, देवर्जन ४१, उदगीर शहरात २१, वाढवणा बु. २४, अहमदपूर १०, चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ १२, नळेगाव ७, चाकूर शहरात ८, देवणी २८, बोरोळ २४, वलांडी १०, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली १३, शिरूर अनंतपाळ १५, साकोळ १५, तर उजेड १०.
गुरुवार सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हाभरात सरासरी ७.२८ मिमी पावसाची नोंद झाली. उदगीर तालुक्यात १८.४३, देवणी २०.६७, शिरूर अनंतपाळ १३.३३, चाकूर ५.८०, तर लातूर तालुक्यात २.१३ मिमी पाऊस झाला. दर महिन्यात बेमोसमी पावसाची पुनरावृत्ती होत असल्यामुळे शेतकरीवर्ग चक्राऊन गेला आहे.