निष्प्रभ प्रशासनामुळे नागरिकांचे हाल सुरूच

गतवर्षी उन्हाळय़ातील पाणीटंचाईमुळे लातूरचे नाव देशभर गाजले. भारतातील सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीबरोबरच जगातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी लातूर गाठले. एखाद्या शहराला रेल्वेने प्रदीर्घ काळ पाणी पुरवावे लागलेली देशातील ती एकमेव घटना होती. पाण्याच्या टंचाईमुळे होरपळलेल्या लातूरला निसर्गाने हात दिला. पावसाची इतकी कृपादृष्टी झाली की नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरणही काठोकाठ भरले. तीन वेळा धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. लातूरकर खूश झाले होते, पण पालथ्या घडावर पाणी, असा अनुभव येऊ लागला आहे.

१९९३ च्या भूकंपानंतर लातूरकरांसाठी संपूर्ण जग मदतीला धावून आले. लातूरकरांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली. आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत यासाठी लातूरकर एकत्रित आले व त्यांनी मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या व रुंदीकरणाच्या कामासाठी लोकसहभागातून तब्बल साडेसहा कोटी रुपये जमवले. अडचणीच्या काळात पाणी साठवून ठेवण्याची जागा वाढवली. सर्वाचा एकत्रित परिणाम कदाचित निसर्गालाही भावला असेल. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने साऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. किमान पुढील तीन वष्रे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणार नाही, याची लोकांना खात्री पटली. केंद्र सरकारने लातूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांची गळती थांबवण्यासाठी अमृत योजनेतून तब्बल ४८ कोटी रुपये देऊ केले. धरणात पाणी आल्यानंतर महापालिकेच्या वतीने नळाद्वारे पाणी पुरवणे सुरू झाले. प्रारंभी १५ दिवसाला व नंतर आठ दिवसाला. धरणात पाणी असल्यामुळे आठवडय़ातून किमान दोनदा पाणी मिळावे इतकी लातूरकरांची माफक अपेक्षा आहे, मात्र अद्याप ती पूर्ण झाली नाही.

मांजरा धरणात सध्या ७१ टक्के (१७२ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा आहे. लातूर शहराला महिन्याला दोन दशलक्ष घनमीटर पाणी लागते. गतवर्षीच्या उन्हाळय़ात दररोज एक कोटी लिटर पाणी उपलब्ध करून ते आठवडय़ाला प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर दिले जात असे. या वर्षी मांजरा धरणातून रोज चार कोटी लिटर पाणी म्हणजे आठ दिवसाला ३२ कोटी लिटर उचलले जाते व ते आठवडय़ातून एकदा वितरित केले जाते. निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था असल्यामुळे व त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे पाणी वितरणातील प्रगती या वर्षीचा उन्हाळा संपेपर्यंत नक्कीच होणार नाही.

पालिकेच्या वतीने गेल्या महिनाभरापासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, आठवडय़ातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हालचाली सुरू असल्याचे सांगितले गेले, मात्र या हालचालींना यश आले नाही. उलट आठ दिवसांऐवजी काही ठिकाणी १० ते ११ दिवसांनंतर पाणी सोडले जाते. गेल्या दहा वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळी २४ तास लातूरकरांना पाणी दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात २०० तासांनंतर एकदा वेळेत पाणी मिळण्याची खात्री देता येत नाही. पाण्याच्या बाबतीत आपल्या देशात सर्वात सोशीक नागरिक कुठले आहेत असे सर्वेक्षण झाले तर त्यात लातूरकरांचा क्रमांक नक्कीच पहिला येईल.

या वर्षी महापालिकेच्या निवडणुका ऐन उन्हाळय़ात होत आहेत. सर्वच पक्ष पुन्हा एकदा लातूरकरांना २४ तास पाणी देऊ, असे आश्वासन देणार. कोणी म्हणेल हे आमचे वचन आहे, तर कोणी म्हणेल हा आमचा शब्द आहे. वचन असो की शब्द असो, तो प्रत्यक्षात येणार का? याबद्दल मात्र लातूरकर चिंतेत आहेत.

सुमारे पाच लाख लोकवस्तीच्या लातूर शहरात कोणत्या गल्लीत कोणत्या तारखेस किती वाजता पाणी उपलब्ध होईल याचे वेळापत्रक निश्चित करण्यात पालिकेला अद्याप यश आले नाही. मुंबई, पुण्यासारखे मराठवाडय़ात मिनिटावर काम चालत नाही. तासाचीही चिंता न करता दिवसभरात केव्हा तरी येईल, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात दिवसही नक्की नसतो अन् त्यामुळेच पाण्यासाठी तिष्ठणे लातूरकरांच्या नशिबी आहे.

पाणीगळती थांबवण्याचे प्रयत्न

शहरातील पाणी वितरण व्यवस्था अतिशय जुनी असून अमृत योजनेंतर्गत या यंत्रणेतील दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाणी उपलब्ध असले तरी गळतीचे प्रमाण मोठे असल्यामुळे पाणी अधिक दाबाने वितरित होत नाही. जुने व्हॉल्व्ह बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक व्हॉल्व्ह बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर कदाचित पाण्याच्या आवर्तनात बदल करता येतील. महापालिका प्रशासन त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

१६ कोटी पाणीपट्टी थकीत

थकीत पाणीपट्टी न भरल्यास कोणत्याही क्षणी शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने लातूर महापालिकेला दिला आहे. महापालिकेच्या वतीने मूळ पाणीपट्टी हप्ते पाडून महापालिका भरेल. पाटबंधारे विभागाने लावलेले दंड व व्याज कमी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल व महिन्याच्या महिन्याला पाणीपट्टीचे पसे भरण्याची यंत्रणा उभी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात हा जर-तरचा मामला आहे. सध्या तरी पाणीपट्टी न भरल्यामुळे पालिका अडचणीत आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]