मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गावर आता चक्क गळती लागली असून, रस्त्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे आढळून आले आहे. सिमेंटच्या रस्त्याला तडे जाऊन त्यातून पाणी वाहू लागल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार बघितल्यावर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबीकडून घटनास्थळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. या घटनेचा स्थानिकांनी व्हिडिओही तयार केला असून, त्यामध्ये रस्त्याला तडे गेल्याचे आणि त्यातून पाण्याच्या धारा वाहत असल्याचे दिसते आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका ते पालीफाटा दरम्यान हा प्रकार झाला असून, रस्त्यामध्ये पडलेल्या भेगा आणि त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यातून पाणी उताराच्या दिशेने वाहत असल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर लगेचच घटनास्थळी जाऊन डांबराच्या साह्याने तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला असल्याचे समजते. पण या महत्त्वाच्या मार्गावर अशा पद्धतीने पाण्याची गळती सुरू झाल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येते आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कायमच वर्दळ असते. पुण्याहून मुंबईच्या आणि मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. या पूर्ण मार्गावर सिमेंटचा रस्ता बांधण्यात आलेला असून, अंतर्गत पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला तडे गेल्याचे आणि त्यातून पाणी बाहेर वाहू लागल्याचे दिसून आले आहे.