आमगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना जलवाहिनी फुटल्याने सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी नागरिकांनी जलशुद्धीकरण संयंत्र परिसर व नगर पंचायत प्रशासकांच्या कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढला.
वाढत्या तापमानामुळे शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, परंतु या जलवाहिनीला दुरुस्त करण्याऐवजी नगर प्रशासनाने तांत्रिक अडचण पुढे करून सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे पूर्वीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांचा असंतोष उफाळून आला. आमगाव येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय पूर्वी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून होत असे, परंतु वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढू लागली. दुसरीकडे जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे जलकुंभ कालबाह्य़ झाल्याने ती योजना गुंडाळून नवीन योजनेसाठी प्रयत्न करण्यात आले. नवीन वाढीव योजना मिळविण्यासाठी नागरिकांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने दोन कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र, या योजनेचे राजकारण करून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी योजनेचे कंत्राट हातातील व्यक्तीला देण्यासाठी ग्रामपंचायतवर दबाव आणला. त्यामुळे योजनेचे बांधकाम व जलवाहिनीचे काम नियम धाब्यावर बसवून करण्यात आले. ही योजना अद्यापही सुरळीत सुरू नसून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या योजनेच्या जलवाहिनीचे बांधकाम निकृष्ट झाल्याने तिला ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. तसेच नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच नगर पंचायत प्रशासनाने तांत्रिक कारण पुढे करून सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा फतवा काढला. त्यानंतर नगर पंचायत प्रशासक राजीव शक्करवार यांच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
आमगाव येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम अपूर्ण असताना व योजनेचे हस्तांतरण झालेले नसतानाही राजकीय पुढाऱ्यांनी श्रेय लाटण्यासाठी योजनेचे लोकार्पण केले. तसेच योजना पूर्ण तयार नसताना अधिकाऱ्यांनी स्वार्थापोटी बांधकामाचे देयक काढून कंत्राटदाराला दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे आता अपूर्ण योजनेतून होणारा पाणीपुरवठा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याऐवजी ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीतून वाहून जात आहे. नागरिक जलवाहिनी दुरुस्तीच्या मागणीसाठी आक्रमक झाल्यावर मात्र, नगर पंचायत व कंत्राटदार एकमेकांवर जबाबदारी ढकलून अंग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.