रायगड जिल्ह्य़ातील अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्य़ातील २० गावे ११२ वाडय़ांना सध्या १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो आहे. मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
रायगड जिल्ह्य़ात गेल्या वर्षी सरासरीच्या ७० टक्केच पावसाची नोंद झाली आहे. घटलेल्या पर्जन्यमानाचा परिणाम आता पाटबंधारे प्रकल्प आणि धरणांमधील पाणी साठय़ावर होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या पूर्वार्धातच जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणी साठय़ात झपाटय़ाने घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक भागांना मे महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्य़ात २० गावे आणि ११२ वाडय़ांना सध्या १७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो आहे. यात कर्जत तालुक्यातील ३ गाव ६ वाडय़ा, खालापूर तालुक्यातील २ गावे ७ वाडय़ा, पेण तालुक्यातील ४ गावे २८ वाडय़ा, रोहा तालुक्यातील १ गाव ३ वाडय़ा, माणगाव तालुक्यातील १ वाडी, महाड तालुक्यातील १ गाव ४ वाडय़ा, पोलादपूर तालुक्यातील ७ गाव ५८ वाडय़ा, तळा तालुक्यातील २ गाव १ वाडी आणि पनवेल तालुक्यातील ४ वाडय़ांचा समावेश आहे. मेअखेपर्यंत यात आणखी काही गाव आणि वाडय़ांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्य़ात दरवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते जून या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी टंचाई आराखडा केला जातो. त्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात पाणीटंचाई जाणवली नाही. डिसेंबर ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ४३३ गावे व १४३३ वाडय़ा आशा एकूण १८६६ गावात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ७ कोटी ८८ लाख ८० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
यात अलिबाग तालुक्यात २१४, उरण १४, पनवेल ५७, कर्जत ९४, खालापूर ९१, पेण २५०, सुधागड ५५, रोहा १०९, माणगाव १२१, महाड ४३४, पोलादपूर २५०, म्हसळा २७, मुरुड ४५, तळा १२ अशा एकूण १८६६ ठिकाणी ही संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संभाव्य टंचाईग्रस्त १२१८ गावांसाठी टँकर किंवा बलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ४ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान पाणीटंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्य़ात ५७७ िवधण विहिरी खोदण्यात येणार आहेत. ७० ठिकाणी नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील ५० गावे आणि १४८ वाडय़ामध्ये िवधण विहिरी खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने माणगाव, पाली, पेण, महाड आणि पोलादपूर तालुक्यांचा समावेश आहे.
ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असेल, त्यांनी संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडे टँकरची मागणी नोंदवणे गरजेचे आहे. गट विकास अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर लगेचच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. असे ए. ए. तोरो, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, रायगड यांनी सांगितले.