रिमझिम पाऊस येऊन गेला तरी टंचाईमध्ये मात्र फारसा फरक पडलेला नाही. टंचाईची तीव्रता मोजता यावी, यासाठी प्रशासनाने नकाशा तयार केला असून, जिल्हय़ात तीव्र टंचाईची २००, तर मध्यम स्वरूपाच्या टंचाईची २९४ गावे आहेत. पाणी वाचवण्यासाठी शहरातील बांधकामे थांबवण्याबाबत महापालिकेला सूचना केली जाईल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारी सांगितले.
पैठण तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असून लोहगाव, विहामांडवा, नांदर, ढोरकीन, वैजापूर तालुक्यातील महालगाव, लाडगाव, नागमठाण, कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे काही गावांत अजून पेरण्याही झाल्या नाहीत. पावसाळी वातावरणामुळे जिल्हय़ात ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस आला नाहीतर चाऱ्याची मोठी टंचाई जाणवू शकेल.
पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. ज्या ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यास विजेची अडचण आहे, अशा ठिकाणी जनरेटरची सोय करता यावी, यासाठी प्रयत्न केले जातील. त्याच्या खरेदीचे प्रस्तावही आतापासूनच तयार केले जात आहेत, असेही विक्रमकुमार यांनी सांगितले.
टँकरने दिले जाणारे पाणी शुद्ध असावे, यासाठी अस्थायी शुद्धीकरण केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार केले जात असून टँकरमधून दिले जाणारे पाणी शुद्ध असावे, असेही प्रयत्न केले जाणार आहेत. जायकवाडी धरणावरून शेतीसाठी सुरू असणारा उपसाही लवकरच थांबवण्यात येणार असून, पुढील वर्षांच्या मे महिन्यापर्यंत पाणी टिकवून ठेवायचे असल्याने सर्वप्रकारची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल, असेही सांगितले जात आहे.
टँकरवर जीपीएस प्रणाली बसवून घेण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. सध्या ३३३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या वर्षी याच तारखेला २१३ टँकर सुरू होते. काही मंडळांमध्ये कमी पाऊस झाल्याने तीव्रता वाढल्याचेही दिसून आले आहे. खुलताबाद आणि सोयगाव हे दोन तालुके वगळता अन्य सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.