गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्य़ात झालेल्या पेरण्यांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी सिंचन विभागास दिले आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही आजपासून जिल्ह्य़ात सुरू झाली आहे.
पावसाने खंड दिल्याने जिल्ह्य़ातील पिकांवर प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच प्रकल्पातील पाणी साठय़ाचा सिंचनासाठी कसा उपयोग करता येईल, याबाबत जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बठक घेतली. बठकीस अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार यांच्यासह जलसंपदाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व अन्य अभियंते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील प्रकल्पांमध्ये पाण्यासाठी राखीव असलेला साठा उर्वरित पाणी सिंचनासाठी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या पिकांना संजीवनी देण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून त्याची कार्यवाही करण्यात आली. त्यात अरुणावती या मोठय़ा प्रकल्पाचाही समावेश आहे.
या प्रकल्पात आज १७.३४ टक्के म्हणजे २९.४६ द.ल.घ.मी. उपलब्ध पाणीसाठय़ातून प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आाठ घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आजपासून ४६ कि.मी. उजव्या कालव्यातून तीन घनमीटर प्रती सेकंद, तर ५६ कि.मी. डाव्या कालव्यातून पाच घनमीटर प्रति सेकंद या प्रवाही व्याप्तीने पाणी सोडण्यात आले आहे. अरुणावतीच्या एक पाळी आवर्तनामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. त्यातून सुमारे ६ हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. बेंबळा नदी प्रकल्पाच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडणे सुरू आहे. ज्या प्रकल्पातून पिण्याचे आरक्षित पाणी सोडून सिंचनासाठी उपलब्ध करून देणे शक्य आहे तेथून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे जलसंपदाच्या अधीक्षक अभियंत्यांनी कळविले आहे. पावसाने खंड दिल्याने प्रकल्पातील पाण्यातून अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने पाणी वापर संस्थांचे सहकार्य, कृषी विभागाचे मार्गदर्शन, तसेच पाणी वापरावर सनियंत्रण यासाठी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता जातीने लक्ष ठेवून आहेत. प्रकल्पाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखेकडे सादर करावे, तसेच सिंचनासाठी असलेल्या पाटचाऱ्या दुरुस्त करून विभागास सहकार्य करावे, असे अधीक्षक अभियंत्यांनी कळविले आहे.